सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; बदलीबाबत उलटसुलट चर्चा


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आज तडकाफडकी बदली झाली असून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी याची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर ४८ तासाच्या आत श्री. जयवंशी यांची राज्य शासनाने बदली केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे..

शासनाने दहा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी जाहीर झाले. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. श्री.जयवंशी यांच्या बदलीसंदर्भात कोणतेही तपशील देण्यात आलेला नाही.

जितेंद्र डुडी हे मूळचे जयपूर (राजस्थान) येथील असून ते 2016 मधील बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सुरुवातीला त्यांची झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. केंद्र शासनाकडे सहाय्यक सचिव म्हणून काम केले आहे.

2018 मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्र केडरकडे त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या पत्नी पोलीस दलात आयपीएस अधिकारी आहेत.

रुचेश जयवंशी यांनी जुलै २०२२ मध्ये जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पश्चिम भागातील महाबळेश्वर, पाचगणी, कास येथील अवैध बांधकामे, मॅप्रो गार्डनबाबत घेतलेली कडक भूमिका यातून त्यांना राजकीय नाराजी भोवल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा आहे.

गेल्या १५ महिन्यात जिल्ह्यात पायभूत सुविधांचा विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकास कामांचे बळकटीकरण ही कामे त्यांनी मार्गी लावली. राज्य शासनाचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर 48 तासाच्या आत श्री. जयवंशी यांची राज्य शासनाने बदली केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे..