मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.

आजपर्यंत ६६ विक्रमी पुरस्कारांचे मानकरी. ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
 राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने देण्यात येणारा माझी वसुंधरा अभियान स्पर्धेचा पन्नास लाख रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्याचीवाडी गावाने पटकावला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सरपंच रवींद्र माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, माजी शिक्षण सभापती यु.टी. माने, पोलीस पाटील विकास माने, उत्तमराव माने, दिलीप गुंजाळकर, सुरेखा माने यांच्यासह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सभापती राहूल नार्वेकर, आमदार संजय गायकवाड, प्रधान सचिव प्रवीण दराडे, अभियान संचालक सुधाकर बोबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

     पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्याने आतापर्यंत ६६ पुरस्कार पटकावले आहेत. पर्यावरण विभागाच्या वतीने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचतत्वावर आधारित हे अभियान राबविण्यात आले होते. एप्रिल २०२२ ते मे २०२३ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले. 

    यामध्ये प्रदुषणमुक्त व फटाकेमुक्त संकल्पना, व्रक्षलागवड, दुर्मिळ वनस्पतींचे जतन संवर्धन, रंगरंगोटी, पर्यावरण बाबत विविध स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, जनजागृती प्रबोधन यासह ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌कचऱ्ऱ्यापासून खत निर्मिती आदी उपक्रम प्रभावीपणे राबवल्याने शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पन्नास लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  

   या यशाबद्दल राज्याचे उत्पादन शुल्क तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, गटविकास अधिकारी गोरख शेलार, यशदाचे मल्लिनाथ कलशेट्टी, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानचे संचालक आनंद भंडारी आदींनी अभिनंदन केले. 

__________________________________

ग्रामविकासातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने नवी दिशा देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. गावकऱ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण केल्यानेच हा गौरव झाला. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्याचे आव्हान गावकऱ्यांनी यशस्वीपणे पेलले. अन्य गावांनी ही यासाठी पुढाकार घ्यावा.     

रवींद्र माने,
सरपंच ग्रा.पं.मान्याचीवाडी
__________________________________