ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचे दैदिप्यमान यश.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
ग्रामपंचायत स्थापनेपासून ग्रामविकासाची पताका कायम फडकत ठेवणाऱ्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत विभाग स्तरावर तिहेरी यश संपादन केले. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. सलग दोन वर्षे विभागस्तरीय "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार" व "डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार" या ग्रामपंचायतीने पटकावला. आठ लाख तीस हजार व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

    संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेमध्ये मान्याचीवाडीने वीस वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. या स्पर्धेसाठी सन 2018/19 आणि 2019/20 या वर्षाकरिता विभाग स्तरीय तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम रखडला होता. नुकताच या दोन्ही वर्षाच्या स्पर्धेचा निकाल पुणे विभागीय आयुक्तांनी जाहीर केला. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी दोन्ही वर्षांमध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने विभागस्तरावर बाजी मारली तर या स्पर्धे अंतर्गत देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार या ग्रामपंचायतीने पटकावला. 

    पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये शाळा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, शौचालय, पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, ग्रामपंचायत करवसुली, गावांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा आदिंची तपासणी करण्यात आली होती. 

    राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, उपायुक्त विजय मुळीक, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानचे संचालक आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे आदींच्या उपस्थितीत पुणे येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रवींद्र माने, सदस्य उत्तमराव माने, दिलीप गुंजाळकर, मनीषा माने, लता आसळकर, सीमा माने, निर्मला पाचुपते, अधिकराव माने, पुनम माने, रामचंद्र पाचुपते, सुरेखा माने आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. 

   या यशाबद्दल उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई, माजी जि.प.सदस्य यु.टी.माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती बोराटे, गटविकास अधिकारी गोरख शेलार आदींनी अभिनंदन केले.