शिवतीर्थाबाबतचे राजकारण थांबवा : मंत्री शंभूराज देसाई


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने प्रस्तावित आयलँड सुशोभीकरणाबाबत निराधार वाद निर्माण करत गैरसमज पसरवले जात असताना पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवभक्त असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने होणाऱ्या आयलँडबाबत शिवतीर्थाची किनार लावून सामान्य जनतेच्या मनात जाणीवपूर्वक काही अपप्रवृत्तीच्या मंडळींकडून गैरसमज निर्माण केले जात आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देसाई परिवाराला अपार श्रद्धा व आदर असून आयलँडबाबत सामान्य जनतेच्या मनात गैरसमज पसरवणाऱ्यांची कीव करावीशी वाटते, अशी भावना ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. तसेच सातारा जिल्हा आणि राज्याला नवी दिशा देणाऱ्या शिवभक्त लोकनेत्यांच्या बाबतीत सुरू असलेले राजकारण थांबले पाहिजे, असे प्रतिपादन ना. शंभूराज देसाई यांनी केले. 

पोवई नाक्यावर शिवभक्त लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौकाचे नामकरण केले जाणार असल्याच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या काहींनी समाजमाध्यमांतून प्रसारित केल्या होत्या. त्यानंतर प्रस्तावित आयलँडबाबत शिवतीर्थ केंद्रस्थानी ठेवून काही मंडळींनी जाणीवपूर्वक विरोधाचे राजकारण सुरू केले. याबाबत ना. शंभूराज देसाई यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास जनतेला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींतील बारा बलुतेदारांना सोबत घेऊनच स्वराज्य कार्य केले. शिवरायांनी आपल्या मावळ्यांपासून स्वतःला कधीच वेगळे केले नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे आणि तो कायम राहील. त्यामुळे सामान्य व सुज्ञ जनता आयलँडबाबत पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांना भिक घालणार नाही, असा विश्वास असल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा शहरातील शिवतीर्थ हे सातारकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असून याबाबत आम्हा सर्वांना आदराची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ स्मारकात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक तयार करण्याचे कोणतेही काम प्रस्तावित नाही. तर पोवई नाका परिसरात शिवतीर्थ स्मारक सोडून इतर ठिकाणी आयलँड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव असून शिवतीर्थाला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याचा कोणताही विचार अथवा प्रस्ताव नाही. शिवतीर्थ परिसर वगळता पोवई नाक्याचा इतर परिसर विस्तृत आहे. त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारकरूपी आयलँड विकसित करण्यात येणार असल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याचा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावर मोठा प्रभाव होता. लोकनेते बाळासाहेब देसाई हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून दिले होते. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शिवभक्त असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांनीच उभा केला आहे. एवढेच नाही, तर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क येथील शिवरायांचे पुतळे, कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ यांची उभारणीदेखील लोकनेते बाळासाहेब देसाई यांनीच केली आहे. असे असताना त्यांच्याच बाबतीत दिशाभूल करत केले जात असलेले राजकारण थांबले पाहिजे, असे प्रतिपादन मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केले. तसेच आयलँडबाबत राजघराण्याची काही शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल. देसाई परिवाराला आणि लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नेहमीच श्रद्धा व आदर आहे आणि कायम राहणार आहे, अशी भावना व्यक्त करत जनतेला सोबत घेऊन पोवई नाका येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड उभारणारच, अशी निर्धारपूर्वक भूमिका ना. शंभूराज देसाई यांनी मांडली