देसाई गटाच्या प्रमुख नेत्याचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तन हा एकच आता पर्याय आहे. गटबाजी व भ्रष्टाचाराची उन्मत्त सत्ता उलथवून टाकण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासारखे विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व तालुक्यातील जनतेला पाहिजे आहे असे मत उधवणे येथील ग्रामस्थांनी आज पाटण येथे व्यक्त केले. यावेळी देसाई गटाचे पाटण तालुका रहिवासी संघाचे उपाध्यक्ष-मानखुर्द व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख श्री.अरुणभाऊ साळुंखे यांनी देसाई गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी स्वागत केले. 

         नुकतेच काही दिवसांपूर्वी उधवणे येथील माजी सरपंच पांडुरंग साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पाठोपाठ आणखी एका मोठ्या नेत्याने प्रवेश केल्याने उधवणे येथे देसाई गटाला मोठे खिंडार पडले आहे. अरुणभाऊ साळुंखे हे उधवणे गावातील देसाई गटाचे एक मातब्बर नेते म्हणून ओळखले जात. त्याचबरोबर त्यांचे मुंबई येथे मोठे राजकीय वलय असल्याने देसाई गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. 

       यावेळी यशवंत केशव साळुंखे , शामराव दगडु साळुंखे, माजी सरपंच पांडुरंग साळुंखे, शंकर साळुंखे, आनंद साळुंखे, सिताराम पाटील, रामचंद्र साळुंखे, बाळू पाटील, बाळू साळुंखे व ग्रामस्थ उपस्थित होते.