आनेवाडी येथे जळालेल्या एसटीबसची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पहाणी


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पुणे-बेगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी डेपोच्या एसटीबसला आज सकाळी 11.15 वाजता आनेवाडी टोलनाक्या जवळ अचानक आग लागली. या आगीमध्ये कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. याची पहाणी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

 यावेळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री. देसाई यांनी एसटीबस कशामुळे जळाली याची प्राथमिक माहिती विभाग नियंत्रक यांच्याकडून घेतली. प्राथमिक तपासणी अहवाल तात्काळ देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

व्यवस्थापकीय संचालकांशी दूरध्वनीवरुन चर्चा

 यावेळी श्री. देसाई यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व कोल्हापूर विभागीय कार्यशाळेचे सहायक कार्यशाळा अधीक्षक संकेत जोशी यांच्याशी दूरध्वनीवरुन झालेल्या घटने विषयी चर्चा केली. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी केल्या.

 ही एसटीबस राधानगरी डेपोची होती यामध्ये एकूण 27 प्रवासी होते. प्रसंगसावधानता बाळगून चालकाने वेळेतच सर्व प्रवाशांना उतरविण्यात आले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.