शंभूराजनीं बाळासाहेबांचे पांग फेडले:मधुकर भावे

'दौलत'चरित्र ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन



कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुबंई येथील राजभवनात बुधवारी रात्री झाले.लोकनेते साहेबांवरील या चरित्रग्रंथाचे लेखन-संपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले आहे.

         महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात संसदीय आणि लोकशाही मूल्यांची रुजवण केली. शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, पायाभूत विकास आदी क्षेत्रांत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असून त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेशजी बैस यांनी केले.

   राज्यपाल बैस यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे अभिनंदन केले.

             मंत्री शंभूराज देसाई यांनी हा चरित्रग्रंथ प्रत्यक्षात आणण्यामागील भूमिका मांडली. यावेळी चरित्रग्रंथाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपली भूमिका मांडली. कोयना धरणाची निर्मिती असो वा कोयना भूकंपानंतरचे पुनर्वसन कार्य असो, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी झोकून देऊन काम करताना पाहिल्याचा अनुभव मधुकर भावे यांनी यावेळी कथन केला. बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राची'दौलत' होते. शंभुराज आज तुम्ही बाळासाहेबांचे पांग फेडले, अलीकडच्या पिढीतील मुलं बापाला विचारत नाहीत आणि इथं तर नातू आजोबांची कीर्ती मोठी करतोय व नव्या पिढीला माहीत करून देतोय हि अभिमानाची बाब आहे. प्रकाशन सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विश्वजित कदम, निरंजन डावखरे, प्रकाशजी सुर्वे, गीताताई जैन,बालाजी कल्याणकर, लताताई सोनावणे, ज्ञानराज चौगुले, माजी आमदार विजय शिवतारे,शरदभाऊ सोनावणे, संजय डी. वाय. पाटील यांच्यासह देसाई परिवारातील सदस्य आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांनी आभार मानले.