पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी मंत्री शंभुराज देसाई गटाचे बाळकृष्ण पाटील तर उपसभापती पदी विलास गोडांबे यांची काल एकमताने निवड करण्यात आली. पाटण बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी पाटणकर गटातून ३ जागा निवडून आलेल्या  आहेत. सोसायटी व ग्रामपंचायतीमधून १५ जागांवर मंत्री शंभूराज देसाई गटाने विजय मिळवत पाटणकर गटाच्या ४५ वर्षांच्या एकहाती सत्तेला धक्का देत सत्तांतर घडवून आणले आहे. या निवडणुकीत मंत्री देसाई यांच्या गटाला तब्बल ४५ वर्षांनी सभापती, उपसभापती पदासह सत्ता मिळाली. यानंतर काल प्रत्यक्ष बाजार समितीच्या सभापतीपदी आडूळचे बाळकृष्ण रामचंद्र पाटील यांची तर उपसभापती म्हणून घोटीलचे विलास हरी गोडांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 मंगळवारी मल्हारपेठ या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सभापती व उपसभापतींच्या निवडी करण्यात आल्या. त्यानंतर दोघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे, कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर यांच्यासह देसाई गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उमेश उमरदंड, गिताजंली कुंभार, सचिव हरिभाऊ सुर्यवंशी यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.