डाकेवाडीच्या अमृताने खाकी वर्दीचं स्वप्न सत्यात उतरवलं


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

जिद्द, चिकाटी, योग्य नियोजन आणि इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढया संकटांना भेदून यशाला गवसणी घालणे शक्य होते. आपल्या अंगावर खाकी वर्दी असावी असं स्वप्न अमृता डाकवेने काॅलेजला असताना पाहिलं आणि ते पूर्ण देखील केले. या तरुणीने मिळवलेले यश कौतुकास पात्र असेच आहे. कारण घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना तिने अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस भरतीमध्ये यश मिळवत खाकी वर्दीचं स्वप्न तिने सत्यात उतरवलं आहे.

डाकेवाडी (काळगांव) येथील अमृता तानाजी डाकवे यांनी मुंबई पोलीस भरतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत अविश्रांत अभ्यास करत यश संपादन केले. घरातील आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या अमृता हिची आई सौ.अलका आणि वडील तानाजी शेतीची कामे करत अमृताच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. शेतामध्ये कष्ट करत या दोघांनी त्यांच्या कुटूंबाचा उदरर्विाह केला आहे. त्याचबरोबर दोघांनी अमृताला मानसिक आणि आर्थिक पाठबळ दिले. अमृतानेही आपल्या आईवाडीलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवत अभ्यास व सराव केला त्यांना घरच्या कामात मदत केली आणि पोलीस भरतीमध्ये यश मिळवले.

या यशाबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, गयाबाई डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, स्पंदन डाकवे यांनी अमृताचा तिच्या आईवडिलांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि पुस्तक देवून सत्कार केला. सत्काराप्रसंगी अमृताच्या आईवडीलांचे डोळे आनंदाश्रूनी भरले होते.

प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवल्याबद्दल विविध स्तरांतून अमृताचे अभिनंदन होत आहे. काबाडकष्ट करुन पोलीस भरतीमध्ये यश मिळवणे हे नक्कीच या क्षेत्रात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत अशी आहे.