तनुजा आचरे ची मुंबई पोलीस पदी निवड.

 


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
पाटण तालुक्यातील कुंभारगांव कळंत्रेवाडी येथील तनुजा केशव आचरे हिची नुकतीच मुंबई पोलीस पदी निवड झाली आहे.  ग्रामीण भागात जन्माला येऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या  प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर पोलीस होण्याची व त्या ध्येया पर्यंत सातत्याने परिश्रम करून ध्येय प्राप्तीसाठी खडतर कष्ट करून पोलीस पदाच्या परीक्षेत 150 पैकी 110 गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या तनुजा केशव आचरे चे सर्वत्र कौतुक होत आहे.                     तनुजा आचरे चे वडील कपडे इस्त्री चा व्यवसाय करतात घरोघरी जाऊन कपडे गोळा करून आपल्या घरी कपडे इस्त्री करून ते प्रत्येकाच्या घरी पोहच करतात तर त्यांच्या पत्नी सुरेखा हया त्यांना पहाटेच्या  वेळी कपडे इस्त्री करण्यास मदत करतात घरचे घरकाम करून सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत दुसऱ्याच्या शेतात भांगलण, खुरपणीचे काम रोजमदारीवर करतात. 

 तनुजा आचरे चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कुंभारगांव येथे तर सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण श्री लक्ष्मी देवी हायस्कुल कुंभारगांव मध्ये झाले पुढील अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण  तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात सुरू आहे ती आता पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.

        तिला तळमावले सह्याद्री  वॉरियर्स करिअर अकॅडमी चे अमोल साठे, शिवराज पाटील, प्रफुल पाटील सर व काकासाहेब चव्हाण कॉलेजचे सचिन पुजारी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. 

        तनुजा आचरे ने  शिक्षण घेत असताना रनिंग मध्ये 800 मीटर धावणे स्पर्धेत  पाटण मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. वीस मिनटात पाच किलोमीटर धावणे यामध्येही आपले कौशल्य दाखवले होते. तिने प्रचंड मेहनतीच्या जोरावर  वयाच्या 20 व्या वर्षी मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस पदी निवड होऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 

तिच्या या निवडीने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या  तिच्या यशाबद्दल कुंभारगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण, दै कृष्णाकाठ प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव पतंगे यांनी तिचा  शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.