कुस्तीपट्टू महिलांच्या आंदोलनाला पाठींबा : अशोकराव थोरात.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
देशाच्या राजधानीमध्ये जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या महिला व त्यांना पाठिंबा देणारे क्रीडापट्टू व पैलवान यांना आम्ही मळाई ग्रुप मलकापूर ता.कराड चे वतीने पाठिंबा देत आहोत.परवा रात्री दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री येऊन कुस्तीगिरांना व आंदोलकांना अत्यंत वाईट वागणूक दिली हे दूरदर्शनवरील दृश्य पाहिल्यावर लक्षात आले. महिला कुस्तीपट्टूंनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याबद्दल तीन महिन्यापूर्वी आंदोलन करून दिल्लीचे क्रीडा मंत्रालय, कुस्तीगीर परिषद यांच्याकडे न्याय मागितला. पण त्यांना गेली आठ दिवस न्याय मिळाला नाही. हे सर्वजण आंदोलनाला बसले आहेत. भारतातील राज्य व राष्ट्रस्तरीय व ऑलिम्पिक पदक विजेत्या पैलवानांनी कुस्तीगिरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने दखल घेतली. जुजबी चौकशी सुरू झाली. महिला कुस्तीपटूंचा विनयभंग व लैंगिक शोषण हे गंभीर गुन्हे असताना त्यांची तात्काळ दखल घेतली जात नाही म्हणून देशातून या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा मिळत आहे. देशाचे क्रीडामंत्री काय करीत आहेत? देशाचे गृहमंत्री या विषयावर बोलत नाहीत व प्रधानमंत्री ही घटना फार शुल्लक समजतात का? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. प्रत्येक प्रश्नावर उठ सूट बोलणारे राजकीय पुढारी गेले कुठे ? राज ठाकरेंना ही घटना माहीत नाही काय? सातारा जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी पैलवान संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मळाई ग्रुप, आदर्श क्रीडा संस्था कराड,कराड तालुका ॲथलेटिक असोसिएशन व सातारा जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष या नात्याने आम्ही सर्वजण महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देत आहोत.