डाॅ.संदीप डाकवेंच्या कलेला अजितदादा पवारांकडून दाद

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

14 हजार पेक्षा जास्त मान्यवरांना कलाकृती भेट देणारे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांना त्यांचे स्केच भेट दिले. जलरंग आणि तेलखडू या माध्यमात साकारलेले स्वतःचे चित्र पाहून अजितदादा पवार यांनी चित्रकार डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांच्या कलेला मनापासून दाद दिली. या चित्राचे बारकाईने अवलोकन करत पवार यांनी डाॅ.डाकवे यांचे कौतुक केले.

सातारा येथे प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांच्या ‘यशवंत’ या गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळयाला अजित पवार आले असता डाॅ.संदीप डाकवे यांनी हे चित्र त्यांना दिले. डाॅ.डाकवे यांनी कलेमध्ये आठ विश्वविक्रम केले असून कलात्मक उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना सुमारे एक लाख रुपयांची रोख आर्थिक मदत केली आहे. डाॅ.संदीप डाकवे हे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची 9 पुस्तके, 13 हस्तलिखिते प्रकाशित झाली असून 4 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

याशिवाय स्वतः लिहलेल्या बातम्यांच्या कात्रणांची प्रदर्शने भरवली आहेत. तसेच व्यंगचित्रे, पेपर कटींग आर्ट, स्पार्कल पेंटींग, कॅलिग्राफी, शब्दचित्रे, अक्षरगणेशा, पत्रमैत्री असे विविध कलाप्रकार हाताळत डाॅ.डाकवे यांनी आपले वेगळेपण जपले आहे. अजितदादा पवार यांनी केलेल्या कौतुकामुळे डाॅ.डाकवे यांच्या कलेला ‘चार चाॅंद’ लागले आहेत.