महाराष्ट्राच्या विचाराचा पाया वक्त्यामुळे भक्कम : आ. अजितदादा पवार


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
वीरता, विद्वत्ता आणि वक्तृत्वाचा संगम प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्यात पहायला मिळतो. महाराष्ट्र हा प्रगत व पुरोगामी विचारांचा आहे. महापुरूषांबद्दल बेताल वक्‍तव्य केले जाते, त्यावेळी मनाला वेदना होतात. बेताल वक्तव्याचा त्यांना कुणी अधिकार दिला? त्यांना कुणी काही विचारायला तयार नाही, हे आपण अनुभवतोय. कुठल्याही देशातील नागरिकांची प्रगती हे त्या देशातील नागरिकांच्या विचारांवर, अवलंबून असते. महाराष्ट्राच्या सामाजिक विचाराचा पाया वक्त्यानीच भक्‍कम केला, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आ.अजितदादा पवार यांनी काढले. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे विद्यार्थी उत्कर्ष प्रतिष्ठान व संस्कृती प्रकाशन पुणे यांच्यावतीने ख्यातनाम वक्ते, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचा सपत्नीक सत्काराचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमास खा. श्रीनिवास पाटील, आ.मकरंद पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. 'पुढारी'चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, सारंग पाटील, अमित कदम, विजयराव कोलते, सुनीता पाटणे, सुनीताराजे पवार प्रमुख उपस्थित होते. आ.अजितदादा पवार म्हणाले, विद्यार्थ्यांकडून प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचा सपत्नीक सेवा गौरव व्हावा उत्साह व आनंद वाढवणारा आहे. अनेक दशके पुरोगामी विचाराची चळवळ चालवली. त्यांच्या जीवन कार्याची, प्रबोधन चळवळीची माहिती देणारा 'यशवंत' ग्रंथ आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यात साहित्य, कला, संस्कृती भिनली होती, तो काळ खा. शरद पवार व मान्यवरांनी पाहिला आहे. डॉ. यशवंत पाटणे हे महाराष्ट्रातील आघाडीच्या वक्‍त्यांमध्ये असून त्यांचे विचार ऐकल्यावर त्यांच्या विद्वत्तेची खात्री पटते. प्रबोधनाची चळवळ पुढे नेण्यासाठी क्रांतीकारी विचार मांडण्याचे धाडस संपूर्ण पाटणे परिवाराकडे आहे. वीरता, विद्वता आणि वक्तृत्वाचा संगम त्यांच्यात पहायला मिळतो. आपल्या महाराष्ट्राच्या समाजिक विचाराचा

पाया भक्कम करणाऱ्यांमध्ये प्र. के. अत्रे, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांचेच कार्य प्रभाविपणे नेण्याचे काम प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे करत आहेत. त्यांच्यात विद्वत्तेचा डामडौल नसून सर्वसामान्य माणसाला आपलंस करण्याची सहजता पहायला मिळते. विचारांना कृतीची जोड देवून वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी त्यांनी ग्रंथ महोत्सवाची चळवळ त्यांनी सुरू

केली. महाराष्ट्रातील युवा पिढीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे. खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणार्‍या माणसांविषयी त्यांना विलक्षण आदर आहे. चार दशकांहून अधिक काळ निष्ठेने त्यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांतून महाराष्ट्रभर विचार जागर केला.प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, जगणे सुंदर करण्यासाठी ईश्‍वराने माणसाला विचार करण्याला बुद्धी, रंजन करण्यासाठी कला आणि सेवा करण्याला हात दिले. संधीचं सोने करतो तो सामर्थ्यवान असतो. जीवनातील गुणवत्ता श्रेष्ठ असते. गुणांच्या टक्केवारीपेक्षा टक्केटोणपे खाऊन मिळवलेले यश म्हणजे गुणवत्ता असते. आज मुल्यांचे पराभव होत असताना महापुरूषांच्या विचाराची पूजा बांधणे आवश्यक आहे.

 आ.अजितदादांचे स्वागत हरीष पाटणे व संभाजीराव पाटणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. संपतराव पार्लेकर यांनी केले. सूत्रसंचलन संजय लोहार यांनी केले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते यशवंत गौरव ग्रंथाचे प्रकाशन करून विद्यार्थ्यांच्यावतीने प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व सौ. सुनीता पाटणे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.