"70 हजार कोटी खर्च करून 1 टक्काही...., फाईल क्लिअरवरुन शंभूराज देसाईंचा अजित पवारांना चिमटा


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. "घाई गडबडीत फाईल क्लिअर केल्या की पृथ्वीराज बाबा म्हणाले तसं होतं. 70 हजार कोटी खर्च करून 1 टक्काही काम होत नाही, असा टोला शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना लगावला आहे. कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ना.शंभूराज देसाई यांचा अजित पवारांना चिमटा...
70 हजार कोटी खर्च करून एक टक्काही फायदा झाला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. हा तोटा असतो घाई गडबडीत फाईल क्लिअर करण्याचा, अशा शब्दात नाा.शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. सुट्टीवर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 65 फाईल क्लिअर केल्या. यावर अजित पवार यांनी टीका केली. याला नाा.शंभूराज देसाईंनी कराड येथे पत्रकार परिषदेत उत्तर दिले. गडबडीत फाईल क्लिअर केल्या की 70 हजार कोटी खर्च करून 1 टक्काही काम होत नाही. त्यामुळे आम्ही चार चार वेळा बघून  फाईल क्लिअर करतो, पब्लिक इंटरेस्ट असेल तरच गडबड करतो. 
आम्हाला लोकांचं हित महत्वाचं आहे, राज्याच्या तिजोरीतील पैसा योग्य प्रमाणात खर्च झाला पाहिजे याची खबरदारी आम्ही घेतो. मुख्यमंत्री सुट्टीवर गावी आले असताना 65 फाईल्स क्लिअर केल्या. अजितदादांना याची माहिती नसेल असंही देसाई म्हणाले.


काय म्हणाले होते अजित पवार?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आत्ताच्या सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरले आहेत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये रेट ठरलेले आहेत. सत्तेत आम्ही होतो पण सत्तेचा माज आम्ही केला नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला. आत्ताचे मंत्री कुणाला विचारत नाहीत, मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं कामं करुन देण्यासाठी मार्केटमध्ये फिरतायेत, असा गंभीर आरोप सुद्धा अजित पवार यांनी केला आहे.