2 हजारांच्या नोटांबद्दल सर्वात मोठी बातमी, RBI कडून छपाई बंद


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. या नोटा व्यवहारात असणार आहेत. सध्या तरी नोटा चलणात सुरु असतील. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून 2 हजाराच्या नोटा बंद होतील, अशा चर्चा सुरु होत्या. सोशल मीडियावर वारंवार याबाबत चर्चा सुरु व्हायची. तर रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने त्यावर स्पष्टीकरण दिलं जात होतं. 2 हजाराच्या नोटा बंद होणार नाही, असं सातत्याने स्पष्ट करण्यात येत होतं. पण आता रिझर्व्ह बँकेने अधिकृतपणे त्याच दृष्टीकोनाने पाऊल सुरु केल्याचं चित्र दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला देशात नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी चलनात असलेल्या 500 आणि 1 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारकडून त्या जागेवर 2 हजाराच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. या नोटा गेल्या 6 वर्षांपासून चलनात आहेत. पण या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून 2 हजाराच्या नोटा बाजारात फार दिसत नव्हत्या. अगदी कमी प्रमाणात या नोटा दिसत होत्या. अखेर या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बँक त्याऐवजी 1 हजाराच्या नोटा आणतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

देशात 2 हजाराच्या नोटा गेल्या तीन वर्षांमध्ये निवडणुकीच्या वेळीत जास्त बाजारात आलेल्या बघायला मिळाल्या आहेत. ऐरव्ही या नोटा जास्त दिसत नव्हत्या.