मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( MIDC) क्षेत्रातील विविध उद्योगात स्थानिक गुंडगिरी व फेक माथाडीकडून होणारा त्रास थांबण्यासाठी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणे, नोंदीत माथाडी कामगारांनाच हक्काची कामे मिळणे तसेच शासनाच्या कामगार विभागाच्या दि. 06/09/2016 च्या शासन निर्णयानुसार माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधिकारी, कामगार आयुक्त कार्यालय व माथाडी बोर्डाचे अधिकारी, युनियन प्रतिनिधी व संबंधितांची संयुक्त बैठक घेणे, नोंदीत कष्टकरी माथाडी कामगार व उद्योजकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी आवश्यकती उपाययोजना करण्याच्या सूचना उद्योग व कामगार विभागाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी दिल्या.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) क्षेत्रातील उद्योगांकडून माथाडी कायद्याची अंमलबजावणी होणे, विविध माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगारांना हक्काचे काम मिळणे, कामाची लेव्हीसह मजूरी माथाडी बोर्डात भरणा होण्याबद्दलचे निवेदन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांना सादर केले होते, त्यासंदर्भात दि. 26 एप्रिल, 2023 रोजी मंत्री महोदय यांनी मुक्तागिरी या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकित या सूचना केल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( MIDC) क्षेत्रातील उद्योगांना आणि कष्टकरी नोंदीत माथाडी कामगारांना फेक माथाडीकडून होणारा त्रास थांबविण्यासाठी कामगार मंत्री, कामगार व उद्योग विभागाचे अधिकारी, उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यांची उपमुख्यमंत्री व गृह मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे संयुक्त बैठक घेण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन देखिल उद्योग मंत्री ना. उदय सांमत यांनी दिले.

या बैठकिस महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, जनसंपर्क अधिकारी पोपटराव रामचंद्र देशमुख, सेक्रेटरी कृष्णा पाटील, सुनिल यादव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( MIDC) चे सीईओ डॉ. विपीन शर्मा (व्हीसीवर), अप्पर कामगार आयुक्त लोखंडेमॅडम, कामगार उपसचिव दादासाहेब खताळ, उद्योग विभागाचे अव्वर सचिव किरण जाधव, ट्रान्सपोर्ट बोर्डाचे अध्यक्ष अ.सं. खरात, सहाय्यक कामगार आयुक्त आयर्न बोर्डाचे अध्यक्ष राजेश आडे, कामगार विकास आयुक्त व कापड बोर्डाच्या अध्यक्षा सुनिता म्हैसकर, उप कामगार आयुक्त व ग्रोसरी बोर्डाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग माथाडी मंडळाचे अध्यक्ष संदेश आयरे, ट्रान्सपोर्ट बोर्डाचे सचिव सुर्यकांत डोबरियाल आदी उपस्थित होते. बैठकित माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी एमआयडीसी क्षेत्रात स्थानिक गुंडगिरी व फेक माथाडीकडून उद्योजक व नोंदीत माथाडी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबतची सविस्तर माहिती बैठकित दिली. एमआयडीसी (MIDC) क्षेत्रात माथाडी कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही, फेक माथाडी व कांही तथाकथीत कामगार नेते उद्योजक व नोंदीत माथाडी कामगारांना त्रास देत आहेत, तो थांबणे आणि उद्योग वाढविणे व शासनाच्या माथाडी कायद्यान्वये नोंदीत असलेल्या माथाडी कामगारांनाच कामे मिळण्याबद्दलची कार्यवाही उद्योग व कामगार विभागाने काटेकोरपणे करण्याच्या सूचना केल्याबद्दल माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले.