लोटळेवाडी येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा
पाटण तालुक्यातील लोटळेवाडी (काळगांव) येथे श्री स्वामी समर्थ मठात झालेल्या श्री स्वामी समर्थ सेवा सांप्रदाय ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या श्री स्वामी समर्थ जयंती सोहळयाचे वर्णन "हा सुख सोहळा स्वर्गी नाही" असेच करावे लागेल. या दिवशी अभिषेक, होमहवन, पुजाविधी, श्री सारामृत पोथी वाचन, आरती व प्रासादिक भोजन, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, मोफत डोळयांचे शिबीर अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती.

यावेळी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची भव्य दिंडी मिरवणूक काळगाव ते लोटळेवाडी अशी काढली. यावेळी रामिष्टेवाडी येथील ह.भ.प.विजय महाराज यांच्या श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, जय मल्हार दांडपट्टा व तलवार बाजी पथक काले आणि भविकांनी काळगांव ते लोटळेवाडी येथे काढण्यात आलेल्या मिरवणूकीत चैतन्य आणले. जय मल्हार या पथकाने चित्तथरारक प्रात्यक्षिके करुन लोकांच्या डोळयाचे पारणे फेडले.

दरम्यान, दुपारी श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनी हरिपाठाचा कार्यक्रम केला. रात्री ह.भ.प.पार्थ महाराज सोंडोली यांचे हरिकीर्तन पार पाडले. तसेच मानव सेवा हाॅस्पिटल पुणे आणि श्री स्वामी समर्थ सेवा सांप्रदाय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांसाठी मोफत डोळयांचे शिबीर आयोजन केले होते. याप्रसंगी मानव सेवा हाॅस्पिटल चे डाॅ.दिपिका लोंढे-पाटील, डाॅ.सागर लोंढे, मा. संजय देसाई साहेब,श्री सुनिल मस्कर,आयडीयल फौंडेशनचे राजू काळे आदि उपस्थित होते.

या शिबीरात 200 लोकांची तपासणी झाली. 150 लोकांना 70 टक्के सवलतीत चष्मे वाटप करण्यात आले. तर 30 रुग्णांचे मोतिबिंदू ऑपरेशन पुणे येथे नेवून मोफत करण्यात येणार आहे. अनेक गरजूंनी या शिबीराचा लाभ घेतला. याच कार्यक्रमात वार्षिक कृपासिंधू पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास लोटळेवाडी येथील तरुण वर्ग, देणगीदार, ग्रामस्थ यांचे खूप मोठे सहकार्य मिळाले.

मानखुर्द-मुंबई, सोनापूर, येळापूर गवळेवाडी, यांसह काळगांव परिसरातील सर्व वाडया वस्त्यांमधील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ जयंती सोहळयाने अध्यात्माबरोबर शिबीर राबवून सामाजिक बांधिलकी जपल्याचे पहायला मिळाले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ट्रस्टमधील विश्वस्त मंडळातील सर्व सदस्य व लोटळेवाडीतील तरुण वर्गाचे अनमोल योगदान लाभले असे ट्रस्टचे संस्थापक / अध्यक्ष श्री सुरेश मस्कर यांनी बोलताना सांगितले.