महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचाच विजय होणार: विक्रमसिंह पाटणकर

मविआ पुरस्कृत 'शेतकरी विकास' पॅनलचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ. पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत 'शेतकरी विकास पॅनल'चाच विजय होणार आहे. हा विजय फक्त मविआ चा विजय नसुन या पाटण विधानसभा मतदारसंघांचीतील प्रत्येक स्वाभिमानी शेतकऱ्यांचा असणार आहे. विरोधकांना या निवडणुकीमुळे तालुक्यातील शेतकरी दिसू लागला आहे. पण गेल्या ५ वर्षात विरोधकांना कधीही या शेतकऱ्यांंची आठवण झाली नाही कि त्यांच्या समस्या दिसल्या नाहीत. अशा संधी साधू बनावट शेतकऱ्यांच्या टोळीची 'टोळधाड' पाटण तालुक्यातील शेतकरी नक्कीच परतावून लावेल असा विश्वास मला आहे असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर यांनी पाटण येथे बोलताना सांगितले. पाटण येथे मविआ पुरस्कृत 'शेतकरी विकास पॅनल'च्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. 

         यावेळी बोलताना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकांच्याच ताब्यात पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती द्या. आजपर्यंत या संस्थेत चांगल्या लोकांनी काम केल्यामुळे अत्यंत खडतर परिस्थितीतून पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रगतीपथावर आली आहे. विरोधक फक्त सत्तेचे भूकेलेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे काही देणंघेणं नाही. सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आजपर्यंत विरोधकांनी ज्या संस्था काढल्या किंवा ताब्यात घेतल्या त्या संस्था एक तर कर्जबाजारी झाल्या किंवा नष्ट झाल्या. विरोधकांनी हजारो सभासदांना चुना लावला, त्यांचे पैसे बुडवले, 50 वर्षे झाले कारखाना चालवत आहेत पण कारखान्याची काय प्रगती केली त्यांनी ? शेतकऱ्यांना, सभासदांना या कारखान्याचा काय फायदा झाला ? शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला पण तो निधी कुठं गेला ? कारखान्याच्या कामगारांची आज दयनीय अवस्था का झाली आहे ? याच जाब पाटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांनी आता विचारला पाहिजे आणि या निवडणुकीत विरोधकांना अद्दल घडवली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

         यावेळी बोलताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा प्रमुख भानुप्रताप उर्फ हर्षद कदम म्हणाले, आज पर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील बहुतांश सहकारी संस्था या पाटणकर गटाच्याच ताब्यात राहिल्या आहेत. परंतु आजपर्यंत विक्रमसिंह पाटणकर दादा किंवा सत्यजितसिंह पाटणकर दादा यांनी कोणत्याही संस्थेत कधीही भ्रष्टाचार केला नाही. किंबहुना दादांच्या या पारदर्शक आणि स्वच्छ कारभारामुळेच जनतेने त्यांच्या ताब्यात या सर्व संस्था दिलेल्या आहेत. याऊलट विरोधकांच्या ताब्यातील संस्था आणि त्यांनी काढलेल्या संस्था कुठं आहेत हे त्यांनाही माहीत नसेल. गेली ५० वर्षे त्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याची प्रगती आपण पाहतच आहोत. सुदैवाने दादांनी 'पाटण शुगर केन'हा नवीन साखर‌ कारखाना निर्माण करण्याचा निर्णय घेतला म्हणून बरं झाले, नाही तर पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची लुट अशीच पिढ्यानपिढ्या सुरू राहिली असती. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपली कोणतीही राजकीय ताकद नसताना निव्वळ सत्तेच्या हव्यासापोटी विरोधकांनी ही निवडणूक लादली आहे. यामुळे ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास तर होणारच आहे पण त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना नाहक धावपळ करावी लागत आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्हीं सर्वजण एकत्र आहोत व कोणत्याही परिस्थितीत विरोधकांचे हवेतील 'हेलिकॉप्टर' जमिनीवर आणणारच असे त्यांनी यावेळी सांगितले. 

         यावेळी बोलताना पाटण तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसचे युवक उपाध्यक्ष डॉ.संतोष कदम म्हणाले, पाटण मतदारसंघात सध्या जे राजकारण चालू आहे ते अत्यंत घातक असून यामुळे पाटण मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. वास्तविक पाहता पाटणला गेल्या ५ वर्षात अनेक खात्यांचे मंत्रीपद आहे पण पाटण तालुक्याचा काय विकास काय झाला आहे ? या मंत्री पदाचा काडीमात्र फायदा पाटण तालुक्यातील जनतेला झाला नाही. येथील राजकारण ठेकेदारांच्या हातात गेलं आहे आणि हे ठेकेदार शासनाच्या पैशाची लुट करुन या अपप्रवृत्तीला बळ देत आहेत. हे घाणेरडं राजकारण संपवण्याची जबाबदारी आता आपली आहे. म्हणूनच पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा देऊ. तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी मतदार बंधू -भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता 'शेतकरी विकास पॅनल'च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करुया असं आवाहन त्यांनी यावेळी केले.

         प्रचाराचा शुभारंभ माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना सुभाष पवार व आभारप्रदर्शन गजानन कदम यांनी केले. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर(संचालक,सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक),भानुप्रताप उर्फ हर्षद कदम (जिल्हा प्रमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), राजाभाऊ शेलार (अध्यक्ष, पाटण विधानसभा मतदारसंघ), नरेंद्र पाटणकर(अध्यक्ष, पाटण तालुका राष्ट्रीय युवक काँग्रेस), संतोष कदम(उपाध्यक्ष, पाटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस), अविनाश जानुगडे (चेअरमन ख.वि.संघ) सुभाषराव पवार (चेअरमन, पाटण दुध संघ), बाळासाहेब राजेमहाडिक(चेअरमन, पाटण अर्बन बँक), नारायण सत्रे (चेअरमन, कोयना कृषक), सौ.स्नेहल जाधव (अध्यक्षा, महिला आघाडी), आजी/माजी जि.प‌./प.स. सदस्य, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविका, ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि.का‌.स.सेवा सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शेतकरी, व्यापारी मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.