माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: माजी विद्यार्थी ही महाविद्यालयाची ओळख असते माझी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असतो. श्री संतकृपा इंजिनिअरिंग मधून आजपर्यंत 2500 ते 3000 विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. सर्वजण नोकरी, व्यवसाय करत आहेत आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहेत हिच महाविद्यालयाच्या यशाची पोचपावती आहे. संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले
यावेळी माजी विद्यार्थी मेळाव्यास दूरवरून बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.स्वानंद कुलकर्णी म्हणाले आज महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश केला तेव्हा अनेक चार चाकी वाहने लागली होती माजी विद्यार्थी स्वतःच्या चार चाकी गाडीतून कार्यक्रमासाठी आले होते. विद्यार्थ्यांची प्रगती व स्वावलंबन हेच या महाविद्यालयाच्या यशाचे गमक आहे.
विद्यार्थ्यांना कॅम्पस मधून नोकरीची संधी प्राप्त व्हावी या करिता महाविद्यालयाच्या प्लेटमेंट सेलचे उत्तम काम चालू आहे.आपण 175 कंपनीशी संपर्कात आहोत तर १५ कंपन्यांशी महाविद्यालयाने एम ओ यु केला आहे. त्यामुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपनीत नोकरीची संधी प्राप्त होत असते. आपण सर्व माजी विद्यार्थी आपल्या नोकरी व्यवसायात व्यस्त व्यापातून वेळ काढून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहीलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो व सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो.
अनेक वर्षानंतर जुने मित्र भेटण्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. याचे आम्हा सर्व स्टाफनाही समाधान वाटत आहे. माजी विद्यार्थी मेळाव्यात अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी गणेश शेडगे, सतीश मुटल, अपेक्षा देसाई, गणेश लुबाळ, अमृता कुलकर्णी, सुशांत पाटील, सपना सुर्यवंशी, दिग्विजय माने, सनी पाटील, रोहित चव्हाण, राम शेवाळे, सुशांत माने, सुनील सुतार, विशाल साळुंखे, ओंकार स्वामी, अनिरुद्ध पाटील, सुरज काकडे, निखिल परीट आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आपला महाविद्यालयातील अनुभव व आठवणी सर्वांसमोर विशद केल्या या महाविद्यालयात शिक्षण घेतलेने आम्ही घडलो स्वावलंबी झालो व एक चांगला संस्कारक्षम नागरिक म्हणून जीवन जगत आहे याचा आम्हाला अभिमान आहे हे महाविद्यालय आम्ही कधीही विसरणार नाही येथील सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही निश्चितपणे मदत करू अशी ग्वाही अनेकांनी यावेळी दिली.
यावेळी श्री संतकृपा इंजिनिअरिंग मधील विविध कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम यादव व भरतराज भोसले यांनी केले तर सीमा शिंदे यांनी प्रास्ताविक केले.सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे भरतराज भोसले यांनी आभार मांनले.