घोषणा देऊन जनतेला भूलवण्याचे काम : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर

 प्रचार सभेत विरोधकांवर टीकास्त्र



पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 'सत्ता ही सामान्य माणसाच्या हितासाठी असते. सत्ता स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी असेल तर त्याचा उपयोग कसा होतो ते जनतेने पाहिले आहे. तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी प्रकल्प आणले ते पळवून नेले जात आहेत. तालुक्यात विकासाच्या नावाखाली पाचशे कोटी, दोनशे, शंभर कोटी अशा केवळ घोषणा देऊन जनतेला भूलवत ठेवले जात आहे,' अशी टीका माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केली.

पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, ठाकरे गटाचे जिल्हा संघटक व सरपंच गजानन कदम, जिल्हा उपप्रमुख रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांची उपस्थिती होती.

माजी मंत्री पाटणकर म्हणाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाजार समिती चालवण्याचे काम सर्व सदस्यांनी केले आहे. संस्था चालवत असताना शेतकऱ्यांच्या हिताकडे पहिले लक्ष दिले पाहिजे. संस्थेचे आणि शेतकऱ्यांचे हित या दोन गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. या भूमिकेतून आपण सर्व मंडळी काम करत असतो.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, 'महायुतीची तालुक्यातील पहिलीच सभा आहे. आजचा दिवस अक्षय तृतीया, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती, शिवजयंती या सणांमुळे सर्व काही जुळून आले आहे. निवडणुकीला सामोरे जाताना ती किती महत्त्वाची आहे याची काळजी घेतली पाहिजे. ही संस्था कशा प्रकारे प्रगतिपथावर पोहोचली याची आपल्याला चांगलीच माहिती आहे. संस्थेमार्फत कामे करत असताना विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करत नेहमी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न हाणून पाडून सर्वांच्या सहकार्याने आज संस्था चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे.

यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, राजाभाऊ शेलार, गजानन कदम, डॉ. संतोष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार यांनी प्रास्ताविक केले. हेळवाकचे सरपंच गजानन कदम यांनी आभार मानले.