सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत दौलतनगर ता. पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत पाटण तालुक्यातील एकूण सहा लाभार्थ्यांना पाच लक्ष रकमेचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनामार्फत नुकताच पणतू खापर पणतू स्तरापर्यंत भूकंपग्रस्त दाखले देण्याबाबतचा निर्णय झाला आहे. त्या अनुषंगाने ७ विद्यार्थ्यांना अर्थात पणतू ना भूकंपग्रस्तांच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले. पाटण तालुक्यातील मळे कोळणे सारख्या दुर्गम भागातील चार कुटुंबांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ४ अनाथ मुलांना सदर योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला. विधवा, परित्यक्ता किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण ९ लाभार्थ्यांना लाभ मंजूर केल्या बाबतचे पत्र देण्यात आले. याशिवाय महसूल विभागामार्फत देण्यात येणारे जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोंगरी व दुर्गम भागातील दाखला, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असले बाबतचा दाखला इत्यादी विविध दाखल्यांचे वितरण तहसील कार्यालय पाटण व उपविभागीय कार्यालय पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनास दिली भेट
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर-मरळी येथे विविध शासकीय योजनांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज या प्रदर्शनाला भेट दिली.
पालकमंत्री श्री. देसाई यांच्या प्रयत्नांतून तालुक्यात करण्यात आलेल्या विकासकामांचा, तसेच शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा या प्रदर्शनात माहितीपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. हे प्रदर्शन सर्वांनी आवर्जून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.