वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड कडून डाॅ.संदीप डाकवेंच्या व्यसनमुक्तीच्या वृत्तमालिकेची दखल


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

व्यसनमुक्ती या एकाच विषयावर एकाच दैनिकात एका वर्षात पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी जास्तीत जास्त लेख लिहून ते प्रसिध्द केल्याबद्दल त्याची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकात झाली असल्याचा मेल डाॅ.डाकवे यांना प्राप्त झाला आहे. यामुळे डाॅ.संदीप डाकवे यांनी वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड मध्ये आपले नाव नोंदवण्याची अनोखी हॅट्रिक सुध्दा साधली आहे. काही दिवसातच यासंबंधीचे सर्टीफिकेट आणि मेडल त्यांना मिळणार आहे. सदर लेखमाला लिहल्यानंतर डाॅ.डाकवे यांनी वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड च्या टीमशी पत्रव्यवहार केला होता. त्याची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकात घेतल्याने डाॅ.डाकवे यांनी लिहलेल्या लेखमालेचा अनोखा सन्मान झाला आहे. या विक्रमाबद्दल सर्व स्तरांतून डाॅ.डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचा हा आठवा रेकाॅर्ड आहे. यापूर्वी जास्तीत जास्त मान्यवरांना त्यांची चित्रे भेट देणे, मराठी संपादकांना त्यांच्या वयाइतकी चित्रे भेट, 1 बाय 1 सेमी आकारात कलाकृती, 54 चित्रे भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाॅकडाऊनकाळात कलेतून समाजप्रबोधन, 81 पोस्ट कार्डातून शुभेच्छा, 75 थोर क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन असे सात रेकाॅर्ड केले आहेत.

गतवर्षी डाॅ.संदीप डाकवे ‘निर्धार व्यसनमुक्तीचा’ या शीर्षकांतर्गत व्यसनमुक्ती या विषयावर लेख, बातम्या, फोटो फिचर, यशोगाथा इ. लिहून त्या प्रसिध्द केल्या आहेत. याबरोबर या बातम्यांचे हस्तलिखित, बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, व्यंगचित्रे, पोस्टर प्रकाशन आदी नावीण्यपूर्ण उपक्रम डाॅ.डाकवे यांनी राबवले होते.

चित्रप्रदर्शन, शिल्प प्रदर्शन, वस्तू प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन किंवा कलात्मकतेने केलेल्या वस्तूचे प्रदर्शन आपण सातत्याने पाहतो. परंतू डाॅ.डाकवे यांनी स्वतः बातम्या लिहून वृत्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या व शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या वृत्तपत्रीय कात्रणांचे प्रदर्शन यापूर्वी अनेकदा भरवले होते. यासाठी सचित्र वृत्तांकन केलेली कात्रणे मोठी करुन ती आकर्षक पध्दतीने कार्डशीट पेपरवर चिकटवलेली होती. प्रत्येक कात्रणाखाली दिनांक व वार लिहून त्यांची कलात्मक पध्द्तीने मांडणी केली होती. या कात्रणांच्या आगळया वेगळया प्रदर्शनामुळे शासनाच्या विविध अभियानाची यशोगाथा, माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे. या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेट देवून कौतुक केले होते.

डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी ‘महात्मा गांधी तंटामुक्त अभियान’, ‘जलयुक्त शिवार अभियान’, ‘बचत गट’, लेक वाचवा अभियान, स्वच्छ भारत सर्वेक्षण, क्षयरोग निर्मुलन अभियान इ. वैविध्यपूर्ण विषयावर लेखमाला लिहल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानावरील लेखमालेचे पुस्तक तयार करुन तत्कालीन मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रकाशन देखील झाले आहे.

डाॅ.संदीप डाकवे केवळ चित्रे न रेखाटता कलेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम वेळोवेळी करत आहेत. आपल्या कलेला आणि लेखनाला त्यांनी समाजप्रबोधनाचे माध्यम बनवले आहे. यामुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 वेळा तर विविध संस्थांनी सुमारे 60 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे.

लेखन व कला यातून आत्मिक समाधान आणि जपलेेली सामाजिक बांधिलकी अतिशय कौतुकास्पद अशीच आहे. त्यांच्या या बांधिलकीचे समाजातून नेहमी कौतुक होत आहे.

एखाद्या विषयावरील लेखमालेचा जागतिक स्तरावर गौरव ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक होत आहे.