स्पंदन दिवाळी अंक व सेल्फी विथ गुढी स्पर्धेचे निकाल जाहीर

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजित केलेल्या दिवाळी अंक आणि सेल्फी विथ गुढी या स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळी अंकासाठी महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा अखंडपणे जपण्यासाठी दिवाळी अंक स्पर्धा घेतली होती. तसेच ‘चला संस्कृती जपूया’ ही टॅगलाईन घेवून ‘सेल्फी विथ गुढी’ ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. या दोन्ही स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

दिवाळी अंक स्पर्धेत सर्जनशीलतेचा नवाविष्कार, ग्रामसेवा, गावगाथा, सुभाशित, रंगतदार, धगधगती मुंबई गुंफण, शब्द शंकरपाळी, गझल अमृत, शब्द शिवार, अवतरण-सकाळ, आयुष्मान, कृष्णाकाठ या अंकांना उत्कृष्ट दिवाळी अंकांचा सन्मान मिळाला आहे. या विजेत्यांना सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

तसेच ‘सेल्फी विथ गुढी’ या स्पर्धेत सौ.ऐश्वर्या प्रसाद काटकर (सातारा), चैतन्य भास्कर करमरकर (सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय, जयवंत निवृत्ती सावंत (मुंबई) आणि विक्रम विष्णू करपे (देवाची आळंदी) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. सौ.कविता सतीश कचरे (तळमावले) यांना उत्तेजनार्थ तर डाॅ.बलराज पाटील यांना विशेष पारितोषिक देण्यात आले आहे. या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक गौरवचिन्ह, पुस्तक आणि अभिमानपत्र देण्यात येणार आहे.

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने शेकडो नावीण्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार इ.नी गौरवण्यात आले आहे. दिवाळी अंक स्पर्धा व सेल्फी विथ गुढी या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.