"…म्हणून एक उमेदवार उभा केला...." चिंचवड निकालावरून पृथ्वीराज चव्हाण यांच मोठं वक्तव्य.

वंचित बहुजन आघाडीवर नाराजी....

मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: कसब्याची जागा ही गेल्या २८ वर्षांपासून भाजपची होती. ती जागा काँग्रेसला या निवडणुकीत मिळाली. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कसब्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. कसबा हा पुणे शहरातला मध्यवर्ती ठिकाणी असलेला मतदारसंघ आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. त्या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक या निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली. महाविकास आघाडीने संयुक्त असा रवींद्र धंगेकर हा उमेदवार दिला. त्यांना सर्वांनी मदत केल्यामुळे हा निकाल लागला आहे. येणाऱ्या निवडणुकीतही अशाच प्रकारचा निकाल लागेल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

कसब्याच्या प्रचारासाठी केंद्रीय पातळीवरील नेते आले होते. पण, महाविकास आघाडी एकत्र आली. विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टाळली तर आपण विजयी होऊ शकतो, हा संदेश या निकालातून असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणाले. चिंचवडच्या निवडणुकीत विरोधकांची मत विभाजन करण्यासाठी एक उमेदवार उभा केला गेला. त्या उमेदवाराने बरीच मत खाल्ली. त्यामुळे तिथं भाजपचा विजय झाला. चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने ताकत नसताना महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपला फायदा करून घेण्यासाठी उमेदवार उभा केला होता. 

वंचित आघाडी शिवसेनेबरोबर असल्याचं म्हणताच, चव्हाण म्हणाले, पुढं काय होते ते पाहुया. वंचित बहुजन आघाडीने चिंचवडमध्ये उमेदवार उभा केला नसता तर काहीसे चित्र वेगळे असते. पण, वंचितमुळे ही जागा गेल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली.

न्यायालयाची निवडणूक आयुक्तांवर नाराजी:

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्त ज्या पद्धतीने नेमले जात आहेत त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.ही पद्धत बदला असे आदेश दिले आहेत. नवीन आयुक्त निवडले जातील तेव्हा ही नवीन पद्धती लागू केली जाईल. सर्वोच्च न्यायालय सध्याच्या निवडणूक आयुक्तांबद्दल नाराज आहे, हे यातून स्पष्ट होते, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.