वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवत युवकास दीड लाखाला गंडा


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सायबर चोरट्यांनी समाज माध्यमांवर आपले नेटवर्क चांगलेच पसरवले आहे. त्यांनी आजवर फेसबुक, व्हॉट्सऍप या लोकप्रिय समाजमाध्यमांना "टार्गेट' केले होते. यानंतर आलेले टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवरही त्यांनी आता आपला मोर्चा वळवला आहे. या माध्यमातून ते दरवेळी नव्या आयडिया वापरून गरजू नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. मागील काही दिवसांपासून सायबर भामट्यांनी टेलिग्रामवर "वर्क फ्रॉम होम'चे आमिष दाखवत फसवणुकीचा नवा फंडा पसरवला आहे.

पाटण तालुक्यातील टेळेवाडी येथील शरद तुकाराम टेळे या युवकाला ही वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवत एक लाख तीस हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

 सुरुवातीला काही आर्थिक मोबदला देऊन विश्वास मिळवत युवकाला सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दखल केला आहे. याबाबत पोलिसांची माहिती अशी आहे की, टेळेवाडी येथील शरद तुकाराम टेळे या युवकाने यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार शरद यांच्या मोबाईलवर १३ फेब्रुवारीला वर्क फ्रॉम होमसंदर्भात मेसेज आला. वर्क फ्रॉम होम करणार आहे का? याबाबत विचारणा झाल्यावर युवकाने मेसेजमध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून काम करणार असल्याचे कळविले.

त्यानुसार संबंधितांनी त्याला ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याचे काम दिले. त्या मोबदल्यात त्यांनी त्याला काही पैसेही दिले. मात्र, आणखी काम पाहिजे असेल तर पैसे भरावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार शरद टेळे याने वेळोवेळी १ लाख २९ हजार ७८० रुपये संबंधितांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाइन पाठवले. मात्र, पैशाची मागणी वाढत असल्यामुळे संशय आल्याने त्यांनी माहिती घेतली असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर टेळे यांनी तातडीने येथील पोलिस ठाणे गाठले व फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दिली. 

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून, गुन्ह्याची पाळेमुळे परराज्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रामचंद्र शेळके तपास करत आहेत. मोबाईलवर येणाऱ्या अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकाराला लोकांनी बळी पडू नये. सावधानता बाळगावी, असे आवाहन या वेळी पोलिसांनी केले आहे.