कुंभारगांव ढेबेवाडी विभागात यात्रा उत्सवाचा हंगाम बहरणार


कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव, ढेबेवाडी विभागातील ग्रामदैवतांच्या वार्षींक यात्रांचा उत्सव गुढीपाडव्यापासून चालु होतो. मार्च अखेर आल्याने यात्रांचा हंगाम बहरला आहे. कामा धंद्या निमित्त परगावी, मुंबई, पुणे येथे असलेले चाकरमनी आप आपल्या गावी येत असतात. एक वार्षिक आनंदोत्सव असतो. या उत्सवासाठी सगळेजण आनंदाने सहभागी होत असतात वर्षभर या यात्रोत्सवाची वाट पाहत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या वार्षिक यात्रेची वाट पाहत असतात.

 या वेळी यात्रांचे खास आकर्षण म्हणजे मातीतील कुस्ती, तमाशा या सर्व बाबींचे योग्य नियोजनासाठी यात्रा कमेटी, ग्रामस्थ व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी यात्रा मोठ्या प्रमाणावर जल्लोषात साजऱ्या होणार असून या साठी गाववार यात्रा कमेटी ग्रामस्थ यांनी नियोजनासाठी कंबर कसली आहे त्या मुळे कोरोना काळातील कसर भरून निघणार असल्याचा अंदाज सर्व थरातून व्यक्त होत आहे.

  मार्च -एप्रिल -मे या महिन्यामध्ये ग्रामदैवतांच्या यात्रा, होत असतात यावेळी हंगामी सुगीची कामे आटोपून कामाचा शिनवटा घालवण्या साठी यात्रेचा उत्सव एक पर्वणीच असते पै-पाव्हण्याच्या भेटी गाठी, चिमुकल्यांची मामाच्या गावाच्या यात्रेला जाण्याची लगबग, मेवा मिठाई इतर खेळणी, पाळणे इतर विविध प्रकारची दुकाने यांची यात्रेतील जागा पाहणी ग्रामदैवत मंदिराची रंग रंगोटी, स्वच्छता, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठकांचा धडाका गावोगावी दिसून येत आहे. यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण गाव व परिसरातील वाडीवस्त्यांची लोक एकत्र येत असतात मित्र मंडळी यांचे बरोबर विचारांची देवाण घेवाण या निमित्ताने होते.

  याच पार्श्ववभूमीवर कुंभारगांव विभागातील यात्रे साठी जंगी निकाली कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे. कोरोना काळातील थांबलेले अर्थ चक्राला गती मिळणार असे बोलले जात आहे ढेबेवाडी विभागातील महाराष्ट्र कर्नाटकातिल लाखों भाविक भक्त यांचे श्रद्धा स्थान असलेले श्री क्षेत्र बनपुरी (ता पाटण )येथील श्री नाईकबा देवाची यात्रा 26 मार्च नैवैद्य दिवस दुपारी 4 वा जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान होणार असून 27 मार्च रोजी पालखी सोहळा संपन्न होणार असून या यात्रेसाठी यात्रा कमीटी यांनी योग्य नियोजन केले असून ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 याच दरम्यान कुंभारगांव विभागातील बामनवाडी येथील श्री म्हसोबा देवाची यात्रा 26 रोजी आहे तर 27 रोजी खेळणे होत आहे तसेच श्री क्षेत्र गलमेवाडी येथील श्री नाईकबा देवाचा 125 वा यात्रा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होत असून चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून 28 मार्च 2023 रोजी सकाळी 8 ते 12 पर्यंत श्री नाईकबा देवास नैव्यद्य, रात्री 8 ते 10 गोंधळ, 10 ते 11 परिसरातील इतर देव, देवता पालखी,सासन काठी आगमन रात्री 11 ते 4 नामांकित लोकनाट्य तमाशा, बुधवार 29 मार्च 4 वा श्रीची आरती 6 ते 10 सासनकाठी, पालखी मिरवणूक सोहळा 11 ते 3 दिवसाचा लोकनाट्य तमाशा,, दुपारी 3 ते 7 निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे 30 मार्च रोजी चाळकेवाडी येथील भैरवनाथ देवाच्या यात्रा भरत असून सकाळी श्रीची आरती रात्री 10 वा परिसरातील यात्रे साठी येणाऱ्या देव देवतांच्या पालख्याचे स्वागत रात्री इंदापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा 31 मार्च रोजी सकाळी 6 ते 10 छबिना दुपारी 3 वा निकाली मातीतील कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे तर 2 एप्रिल ला कुंभारगांव येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी पाऊतका वेशीवरील श्री लक्ष्मी देवीचा भांडार होणार आहे. 5 एप्रिल ला यादववाडी येथील जोतिर्लिग देवाची यात्रा भर असून 6 एप्रिल ला खेळणे होणार असून याही ठिकाणी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले आहे 6 एप्रिला कळंत्रेवाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती व पाऊतका वरील श्री लक्ष्मीदेवी मंदिर असा संयुक्त भंडारा होणार आहे या नंतर खळे येथील जोतिर्लिंग यात्रा 7 एप्रिल, 9एप्रिल धामणी भराडी माता, 14 एप्रिल काढणे येथील श्री सिद्धेश्वर, 21 एप्रिल कुठरे येथील श्री निनाई देवीची यात्रा होणार आहे. अशा पद्धतीने या दोन महिन्यात ढेबेवाडी विभागात गावोगावच्या यात्रेने एक वेगळा उत्साह पाहावयास मिळणार आहे.