भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसनं हिसकावला ; रवींद्र धंगेकरांचा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय

 पुणे | कृष्णाकाठ वृत्तसेवा

तब्बल 32 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्ता असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय शिंदे गटाचा आणि मनसेचा पाठिंबा असतानाही भाजपला ही सीट राखता आलेली नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. त्यांनी एकाही फेरीत भाजपच्या हेमंत रासने यांना वरचढ होऊ दिलं नाही. प्रत्येक फेरीत त्यांनी दीड ते दोन हजारांची लीड घेतली. त्यानंतर त्यांनी पाचव्या फेरीपासून पाच हजारांची लीड घेतली. ही लीड वाढतच राहिली. पण कमी झाली नाही. अखेर 19व्या आणि शेवटच्या फेरीत त्यांनी 11 हजार 40 मतांची आघाडी घेत हेमंत रासने यांना पराभूत केलं. शेवटच्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मते मिळाली. तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते मिळाली.