चेंबूरच्या माहुल गावात १६ मार्चपासून रंगणार चार दिवसीय कोळी महोत्सव

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  चेंबूरमधील माहुल ग्राम समिती आणि माहुल ग्राम हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने विश्वस्त समितिचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेविका सिमा माहुलकर यांच्या सौजन्याने यंदा १७ वा माहुल फेस्टिवल सी फूड कोळी महोत्सव येत्या १६ ते १९ मार्च दरम्यान दररोज संध्याकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत माहुलकर मनोरंजन मैदान माहुल गांव येथे आयोजित करण्यात आला आहे. 

या महोत्सवाची सुरूवात १६ मार्च रोजी संध्याकाळी ५  वाजता एकविरा आई देवी पालखी  मिरवणुकीने होणार आहे.त्यानंतर पुढील तीन दिवस विविध कार्यक्रम पडतील. या कार्यक्रमास अनेक सिने अभिनेते तसेच राजकीय नेते मंडळी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.जागतिकीकरण व स्थित्यंतराच्या काळात कोळी समाजाची सभ्यता व संस्कृति जोपासणे व याद्वारे आर्थिक विकासाची संधी निर्माण करण्याचा तसेच फ्लेमींगो पक्षी प्रचार प्रसिद्धी करणे हा संस्थेचा प्रयत्न राहिला आहे.आगरी कोळी बांधवांना एकत्रित करून त्यांच्या कलागुणांना वाव देत समाजाच्या संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने हा चार दिवसीय महोत्सव आयोजित केला आहे.या महोत्सवात सांस्कृतिक-पारंपरिक नृत्य, नाट्य या कार्यक्रमांबरोबरच आगरी-कोळी समाजातील चविष्ट आणि चमचमीत मटण, म्हावरा (मासे) आणि तांदुळाची भाकरी अशा खाद्यपदार्थांची मेजवानीही मिळणार आहे.त्यामुळे अधिकाधिक संख्येने लोकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन  समितीचे सेक्रेटरी आशिष चव्हाण आणि कार्यकारी समितिचे गणेश वैती, अ‍ॅड.विनोद नायर, यशवंत माहुलकर, रविंद्र माहुलकर, कमलाकर कोळी यांनी केले आहे.