आबा, तुमच्या रुपाने माणुसकी जपायचीयं...

स्व. ज्ञानदेव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिरआबा, तुम्ही म्हणजे 'कष्टत्व'. सतत कृतिशील. स्मितहास्य म्हणजे तुम्हाला मिळालेली दैवी देणंच. लहान असो की मोठा तुम्ही अद्वितीय प्रेम करुन माणुसकी जपली. तीच माणुसकी जपण्याचा आम्हालाही प्रयत्न करायचा आहे. तुम्ही ज्यांच्यावर हृदयांपासून प्रेम केले, तुमचं 'असणं' सदैव ज्यांच्या हृदयस्थ आहे, त्यांच्यासाठी... तुम्ही जसं जगासाठी जगलात, तसेच आम्हालाही जगायचं आहे.

जन्म, मृत्यू अटळ आहे. कोणालाही चुकणार नाही. अगदी तसाच मृत्यूचा फेरा आबांच्याही जीवनात आला. तो दिवस १२ मार्च २०२२. ज्या देहाने अगणित कष्ट उपसले. आपल्या कर्तबगारीने समाजाला भरभरुन दिले. कोणाच्या मनालाही दुखवले नाही. वेळप्रसंगी स्वत:चा खिस्सा रिकामा करुनही दुसऱ्याची ओंजळ भरली. आम्हाला अंगा-खांद्यावर खेळवले. मायेची उब दिली. शाबासकीची थाप दिली. घडविले. तो देह अखेरचा विसावला. 

आबा, तुम्ही म्हणजे कष्टत्व, तर आई म्हणजे देवत्व. बाप म्हणजे जगातील सगळ्यात मोठे आभाळं..., आई म्हणजे प्रेमाचा अथांग महासागर... दोघेही आम्हाला देहरुपाने सोडून गेले. पण, आम्ही पोरके झालो नाही, आणि होणार नाही. तुमचे गुण, कर्तृत्व, संस्कार आमच्यात उभे करुन गेलात. तुम्ही दोघांनी माणसांवर निरंतर प्रेम केले. शेकडो जणांना मायेची उब दिली. आजही तुमच्या आठवणींनी अनेकांच्या हृदयाला पान्हा फुटतो. म्हणूनच तर तुमचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही अटोकाट प्रयत्न करतोय. 

भगवान योगेश्वर, परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) व आई- आबांच्या आशिर्वादाने 'स्व. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुद्देशीय सामाजिक संस्था' उभी केली. आईच्या प्रथम पुण्यस्मरण दिनीही सह्याद्रि हॉस्पिटलच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. सुमारे ४०० हून अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला. प्रसिध्द व्याख्याने प्रा. नितीन बानगुडे- पाटील यांचे व्याख्यान, खा. श्रीनिवास पाटील यांचे मार्गदर्शन, त्यानंतर महिला उद्योगिनी मेळावा, असो की अन्य कार्यक्रम या संस्थेने समाज उध्दारासाठी राबविले अन् ते यशस्वीही केले. ही संस्था आईचे देवत्व, आबांचे कष्टत्व घेवून अखंडपणे कार्यरत राहतीलच. 

___________________________________
आज मोफत आरोग्य शिबिर 
स्व. ज्ञानदेव पाटील यांचे प्रथम वर्ष श्राध्द विधी बुधवारी, दि. १ मार्च रोजी आहे. त्यानिमित्तानेही लायन्स इंटरनॅशनल क्लब, लायन्स क्लब कराड सिटी यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिर दुपारी १२ वाजलेपासून आयोजित केले आहे. डॉ. महेश खुस्पे, लायन सोफिया कागदी, डॉ. शर्मिष्ठा गरुड (एमएस) हे उद्घाटक म्हणून, तर डॉ. सुशीलकुमार घार्गे (एमबीबीएस, एमडी मेडिसिन), डॉ. किरण घार्गे (एमबीबीएस, एमडी, बालरोगतत्ज्ञ), डॉ. प्रज्योत माने (एमबीबीएस, एमएस) हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. हे शिबिर तांबवे, ता. कराड येथील गांधी चौकात होणार आहे.
___________________________________

- तुझी लेकरं
विकास पाटील ८८०५००७२७८
विशाल पाटील ७३५००१७९९९
सौ. नयना खबाले- पाटील