दरोडा टाकणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद ... 14 पिस्टलसह 22 काडतूस जप्त


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
दरोडा टाकण्याच्या हेतुने जमलेल्या दहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किंमतीची 14 देशी पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील राजमाची येथे सातारा गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपअधिक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी कराड शहरात कोंबींग ऑपरेशन राबवत असताना खबर्‍याकडून त्यांना गोपनीय माहिती मिळाली. यामध्ये कराड-विटा मार्गावर जानाई मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात काही लोक दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दरोडेखार्‍यांना पोलीस आल्याची माहिती मिळताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. 

यावेळी 10 दरोडेखोरांकडून 9 लाख 11 हजार 900 रुपये किंमतीच्या 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जीवंत काडतुसे, मिरची पुड, कोयता असा मुद्देमाल जप्त केला. या दहा जणांविरूध्द कराड शहर पोलीस ठाण्यात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सनी उर्फ गणेश शिंदे रा. ओगलेवाडी ता. कराड, अमित हणमंत कदम रा. अंतवडी ता. कराड , अखिलेश सुरज नलवडे रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड,धनंजय मारुती वाटकर रा.सैदापूर कराड, वाहीद बाबासाो मुल्ला रा. विंग ता. कराड, रिजवान रज्जाक नदाफ रा. मलकापूर, चेतन शाम देवकुळे रा. बुधवार पेठ महात्मा फुलेनगर कराड, बजरंग सुरेश माने रा. बुधवार पेठ कराड, हर्ष अनिल चंदवाणी रा. मलकापूर, तुषार पांडूरंग शिखरे रा. हजारमाची कराड या दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपधिक्षक रणजित पाटील यांच्या सुचनेनुसार परि. पोलीस उपअधिक्षक अजय कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली