धनुष्यबाण आणि नाव आम्हाला मिळणं म्हणजे सत्याचा विजय, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

 
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे शिंदे गट शिवसेनेसाठी आजचा हा आनंदाचा दिवस आहे. या निकालाच्या रुपाने आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे. यापुढे आम्ही शिवसेनेचे ज्वलंत हिंदूत्वाचे काम अधिक जोमाने देशभर करणार आहोत. अखेर सत्याचा व न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाईयांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली असून आता धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय देत धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गट शिवसेनेला दिले. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. आज निवडणूक आयोगाने ७८ पानांची निकालपत्र दिले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आजचा आनंदाचा दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिले आहे. या निकालाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे आमच्या घरातील बाळासाहेबांच्या प्रतिमेस आम्ही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यापुढे शिवसेनेचे ज्वलंत हिंदूत्वाचे काम आम्ही अधिक जोमाने राज्यात व संपूर्ण देशात करु. नव्या ताकतीने व जोमाने काम करु. अखेर सत्याचा व न्यायाचा विजय झाला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बहुमत असून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे बहुमत असल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. आता या क्षणापासून आम्ही सर्वजण नव्या जोमाने कामाला लागणार आहोत.