'श्रीनिवास' देवनागरी फॉन्टची निर्मिती

खा.श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिनी सनबीमची अनोखी भेट कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा 
वळणदार, सुंदर व आकर्षक अक्षराच्या मराठी देवनागरी लिपीतील नवीन ‘श्रीनिवास’ फॉन्टची निर्मिती करण्यात आली आहे. संगणक शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर सनबीम संस्थेने खा.श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला असून हस्ताक्षरावरून बनवलेल्या या फॉन्टचे अनावरण खा.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खा.श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिरंतन टिकणारी, त्याचबरोबर लोकांना दैनंदिन कामकाजात वापरता यावे या भावनेतून त्यांना अनोखी भेट देण्यासाठी सनबीमचे प्रशांत लाड यांनी या फॉन्टची निर्मिती केली आहे. हस्ताक्षरावरून संगणकावर फॉन्ट बनविण्याची प्रक्रिया फार क्लिष्ट असते. प्रथम मुळाक्षरे, जोडाक्षरे व इतर सर्व आकार बोरू किंवा कट निबच्या साह्याने कागदावर काढावे लागतात. ते स्कॅन करून संगणकावर घ्यावे लागतात. त्यानंतर व्हेक्टर ग्राफिक्स सॉफ्टवेअरमध्ये स्कॅन केलेल्या अक्षरांना आणखी रेखीव बनवावे लागते. पुढे प्रत्येक अक्षर किबोर्डवरील एकेक बटनाला जोडावे लागतात. प्रशांत लाड या उपक्रमावर मागील 6 महिन्यापासून काम करीत होते. त्यांच्याकडे संगणक तंत्र व सुंदर हस्ताक्षर (कॅलिग्राफी) या दोन्हीचे ज्ञान असल्यामुळे त्यांना कमी वेळेत या फॉन्टची निर्मिती करता आली. या उपक्रमासाठी त्यांना सनबीम शिक्षण समूहाचे कुटुंब प्रमुख सारंग पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. ‘श्रीनिवास’ फॉन्ट हा देवनागरी युनिकोड फॉन्ट आहे. युनिकोड फॉन्टमुळे सर्व प्रादेशिक भाषांना संगणकावर स्थान देणे शक्य झाले. सनबीम संस्थेचे रौप्यमहोत्सोवी वर्ष सुरू आहे. खा.श्रीनिवास पाटील हे सनबीम संस्थेचे आश्रयदाते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात सनबीन अग्रेसर आहे. संगणक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या सनबीमच्या या उपक्रमाने लक्ष वेधले असून सुवाच्च व सुंदर अक्षर प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. लवकरच हा देवनागरी फॉन्ट सर्वाना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. अनावरण प्रसंगी सनबीमचे नितिन कुडले, अतुल भिंगे, प्रशांत पापळ, जयंत निकम, अनिल गावंडे, राहुल संसुद्दी, रूपेश सुतार, दादासो नांगरे व सनबीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.