भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

 

मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे.या विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवण्यात आला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीला यश आलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने तर राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती. 
विरोधकांची मागणी आणि सातत्याने होणारे आंदोलन यामुळे राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा दर्शवित राजीनामा दिला होता.पंतप्रधान कार्यालयाने कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला होता.राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला त्यामुळे राज्यपाल कोश्यारी अखेर पायउतार झाले आहेत.
देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपाल यांना बदलण्यात आलं आहे त्यात भगतसिंह कोश्यारी यांचंही नाव आहे.
त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.