सातारा जिल्ह्यातील संवादाचे जाळे अधिक मजबूत होणार : खा. श्रीनिवास पाटील

आणखी सहा गावांमधील मोबाइल मनोऱ्याला मान्यताकराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने पाटण व जावळी तालुक्यातील आणखी ६ गावांत मोबाइल टॉवरला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेली बीएसएनएल सेवा सुरळीत करण्यासाठी श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी लोकसभेत आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नातून या अगोदरच जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील १६६ गावांत टॉवर मंजूर झाले आहेत.

आता आणखी पाटण, जावली व सातारा तालुक्यातील ७ टॉवरला मंजुरी मिळाली आहे. पाटण, जावली व सातारा तालुक्यातील दुर्गम भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी पाटण तालुक्यातील कारळे, गलमेवाडी, सळवे, ऊरुल आणि जावली तालुक्यातील फाळणी, वाघदरे व सातारा तालुक्यातील पारंबे गावांसाठी बीएसएनएलचे मोबाइल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

सातारा जिल्हा हा डोंगररांगामध्ये विखुरला गेला आहे. आजच्या इंटरनेट युगात येथील बीएसएनएलचे नेटवर्क पिछाडीवर पडले आहे. दुर्गम आणि डोंगरी भागात बीएसएनएलची सेवा तेवढी प्रभावीपणे मिळत नाही. त्यामुळे आवश्यक बनलेल्या मोबाइल सेवेअभावी स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता मोबाइल टॉवरची गरज लक्षात घेऊन श्रीनिवास पाटील त्यासाठी प्रयत्नशील असून सदर टॉवरला मंजुरी मिळाली आहे.