गोळेश्वर येथे सव्वाकोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ.
कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: कराड दक्षिण मतदारसंघातील लोकांनी जो विचार जपला आहे. त्या विचाराचे पावित्र्य दुषित होणार नाही, याची काळजी लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. यातून स्फूर्ती घेवून यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील - उंडाळकर यांच्यासह मी व खा. श्रीनिवास पाटील यांनी नेतृत्व करत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जपणूक केली आहे. या मतदारसंघाचा इतिहास जपूया, असे सांगून बहुजन व शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामध्ये कोणी विष कालवू नये. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
गोळेश्वर (ता. कराड) येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून एक कोटी दोन लाख रुपये व खा. श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून आठ लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
खा. श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील - उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजित चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रमोद चौधरी, कराड तालुका खरेदी - विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हाईस चेअरमन जगन्नाथ मोरे, नरेंद्र नांगरे - पाटील, कराड अर्बन बँकेचे संचालक महादेव शिंदे, मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नितीन थोरात, कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव सुतार, माजी सदस्य नामदेव पाटील, गोकाक पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष सावकर जाधव, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात यांची उपस्थिती होती.
लोकांच्या मतांचा आदर करत आम्ही काम करत आहे. असे सांगून आ. चव्हाण म्हणाले, राज्यात सद्या अस्थिर परिस्थिती आहे. केवळ वीस मंत्री कार्यरत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार करता येत नाही. एकेकाळी राज्य प्रशासनाची किर्ती व आदर्श असणाऱ्या राज्याची आज दुर्दैवी अवस्था आहे. हिवाळी अधिवेशनात ठोस हाती आले नाही. एका मागोमाग मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. बिल्डरांच्या हातामध्ये राज्य व्यवस्था गेली आहे. हे सर्व पाहता आपल्याला योग्य लोक निवडता आले पाहिजेत, याची जाणीव झाली. राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसविणे कठीण ठरेल. ते म्हणाले, राज्याचा एक नंबर कोणी मागे घालवला. नरेंद्र मोदी गुजरातला प्रकल्प पळवत आहेत. त्यांना कोणी विचारत नसल्याने युवकांचे भवितव्य अंधारात आहे.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, एका वाड्यात आम्हा दोघांच्या दोन चौकटी आहेत. मी आणि पृथ्वीराज बाबा हातात हात घालून मतदारसंघ पुढे घेवून जावू. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विचार करा. व चांगल्याला साथ द्या.
मनोहर शिंदे म्हणाले, माझ्या आणि गोकाक संस्थेच्या वाटचालीत गोळेश्वरचे मोठे योगदान आहे. या गावची विकासाची भूक वाढली आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण व खा. श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून गावचा विकास साधण्यासाठी त्यांना साथ देवूया.
जयवंतराव जगताप म्हणाले, गोळेश्वरच्या विकासाचा निधी पाहता पृथ्वीराजबाबा पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचा भास होत आहे. कराड दक्षिण मतदारसंघातील जनता विकासाच्या मागे जात आहे.
संजय जाधव यांचेही भाषण झाले. दौलतराव इंगवले, गोकाकचे माजी अध्यक्ष संजय जाधव, माजी सरपंच संतोष जाधव, सचिन पाटील, अनिल जाधव, हणमंतराव जाधव, सहदेव झिमरे, निवास जाधव, श्रीरंग जाधव यांनी स्वागत केले. विकास जाधव यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. दौलतराव इंगवले यांनी आभार मानले.