विद्यार्थ्यांना जीवनात लीडरशिप करता आली पाहिजे: अमरनाथ चक्रदेव

श्री संतकृपा अभियांत्रिकी मध्ये LEADERSHIP TALK कार्यक्रम संपन्न 




घोगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात Leadership करता आली पाहिजे. नोकरी, व्यवसाय व वैयक्तिक जीवनात जबाबदारी उचलणारा विद्यार्थी, व्यक्ती लीडर होऊ शकतात. जबाबदारी ढकलणारा, झटकणारा व्यक्ती जीवनात कधीच लीडर होऊ शकत नाही असे प्रतिपादन उद्योजक व इंडस्ट्री तज्ञ अमरनाथ चक्रदेव यांनी व्यक्त केले.

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंजीनिअरिंग या महाविद्यालयात आयोजित Leadership Talk व poster Presentation या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

यावेळी इंडस्ट्री तज्ञ संदीप पत्रावळे, उद्योजक रविंद्र देवधर, प्रसाद भागवत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात निर्माण केलेल्या इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले‌. 

यावेळी बी.टेक च्या प्राध्यापकांनी त्यांना या सेंटरची सविस्तर माहिती दिली. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व स्टार्टअप साठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. 

यावेळी प्रमुख अतिथी व मान्यवरांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी बुके देऊन सत्कार केला.

यावेळी विद्यार्थ्यांना पुढे मार्गदर्शन करताना अमरनाथ चक्रदेव म्हणाले कोणतेही क्षेत्र निवडताना विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असणे अतिशय गरजेचे व महत्त्वपूर्ण असते. जो स्वतःला समजतो, ओळखतो त्याची निश्चितपणे वेगाने प्रगती होते. स्वतःला समजून उमजण्याची प्रक्रिया प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे. जीवनात ज्याच्याकडे संयम व परिश्रम करण्याची वृत्ती असेल तोच व्यक्ती, तोच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो.

सध्याच्या वर्तमान काळात मोबाईल वापराचा अतिरेक होत आहे अनेक विद्यार्थी मोबाईल मध्ये तास-नतास व्यस्त असतात. मोबाईलचा अतिरेक जीवनात हानिकारक व तोट्याचा ठरु शकतो याचे भान प्रत्येकाने ठेवणे काळाची गरज आहे.



यावेळी इंडस्ट्री तज्ञ संदीप पत्रावळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले प्रत्येकाने आपल्या कामाचे वेळापत्रक तयार करा, खूप परिश्रम करा, संयम ठेवा तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. नॉलेज सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमच्याकडे किती नॉलेज आहे याला जगात महत्व आहे. जीवनात चॅलेंज स्वीकारा, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जा यश निश्चित मिळेल पण जीवनात शॉर्टकटचा अवलंब करू नका त्यामुळे आयुष्यभर तोटा होतो असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.

यावेळी रवींद्र देवधर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये असणारे कामकाज, जागतिक बाजारपेठ, स्टार्टअप याबाबत सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योजक बनण्याचे व उद्योजक बनून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रसाद भागवत यांनी श्री संतकृपा इंजीनिअरिंग महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल करत असलेल्या कार्याची व पुढील नियोजनाची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी 100 पेक्षा अधिक इंडस्ट्रीजच्या आम्ही संपर्कात आहोत याबद्दलची सविस्तर माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या प्रास्ताविकात त्यांनी मान्यवरांना संस्थेची व महाविद्यालयाची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालय विद्यार्थ्यांना देत असलेल्या सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.



सदर पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका भाग्यश्री पाटील व राधा गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद भागवत, अमित जगदाळे, अतुल कोळेकर, संदीप देशमुख, भाग्यश्री पाटील, राधा गोसावी या स्टाफनी उत्तम प्रकारे केले.

हा महत्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी यांनी विशेष अभिनंदन केले.