सरकारी अधिकारी म्हटलं की बदली, नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो:विवेक लावंड


ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सरकारी अधिकारी म्हटलं की बदली, नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम, राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव उपक्रम, योजना, तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम लक्षात राहतात अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती आहे. असे प्रतिपादन पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांनी केले.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यानिमित्त ढेबेवाडी विभाग पोलीस पाटील यांच्या वतीने पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेक लावंड यांच्या प्रमुख उपस्थितीत ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांना निरोप देण्यात आला तर ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. अशा संयुक्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच जेष्ठ पत्रकार रविंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या वेळी त्यांनी संतोष पवार यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच नूतन API अभिजित चौधरी यांचेही स्वागत केले.

या वेळी आदर्श सरपंच रवींद्र माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेले अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोरोना, अतिवृष्टि,गुन्हेगारी यावर आपल्या उत्कृष्ट कार्यपद्धतीने ठाण्यातील सर्व सहकारी, पोलीस पाटील यांचा समन्वय साधत सर्व परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवण्याचे काम केले.

 या वेळी निरोपाला उत्तर देताना संतोष पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. निरोप समारंभाचे आयोजन केल्याबद्दल ढेबेवाडी विभागातील पोलीस पाटील यांचे विशेष आभार मानले. 

 आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत भाग्यश्री माने खून प्रकरण तसेच रुवले येथील प्रकरण किंवा अतिवृष्टी मध्ये जिंती येथील जितकरवाडी व धनावडेवाडी येथील कामाचा लेखाजोखा करत या कामामध्ये सर्व पोलीस पाटील तसेच पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी यांनी मोलाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत अडीच वर्षाच्या कामामध्ये महत्त्व पूर्ण कामगिरी बाजावल्याबाबत सर्वांचे संतोष पवार यांनी आभार मानले. 

             या कार्यक्रमात नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस पाटील मनीषा पवार व अवधुत डाकवे यांचे ही मनोगत झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार पोलीस पाटील अमित शिंदे यांनी मांडले.