विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे - ह. भ. प. सुभाष महाराज घाडगे

 

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून वाटचाल करावी असे प्रतिपादन ह. भ. प. सुभाष महाराज घाडगे यांनी केले ते महंत आबानंदगिरी चारिटेबल ट्रस्ट संचलित महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे श्रद्धास्थान महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, डॉ. संदीप डाकवे, निशा लोहार, लक्ष्मण पवार, सोनाली पवार, सुनील धुमाळ, शंकरभाऊ पवार, सारिका गुठाळे, ट्रस्ट चे संस्थापक राजेंद्र पांचाळ, वसतिगृहाच्या अधीक्षक कविता पांचाळ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी कविता पांचाळ, केंदप्रमुख अरविंद दळवी, निशा लोहार, डॉ. संदीप डाकवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी बोलताना आबानंदगिरीजी महाराज म्हणाले, आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. ज्या विद्यार्थ्यांना बक्षीसे मिळाली आहेत त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांनी निराश न होता पुढच्या वर्षी हे बक्षीस मला कसे मिळेल अशा विचाराने तयारीला लागले पाहिजे. 

दरम्यान, वर्षभरात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी, दीपप्रज्वन आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुलींनी स्वागत गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमांची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जयवंत तरडे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कांबळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गवळी मॅडम, जितेंद्र पिसाळ, महाले सर, सुरवसे सर, कर्मचारी संदीप भिसे, सदाशिव गुठाळे यांनी विशेष परिश्रम केले.