डाॅ.संदीप डाकवेंच्या नवव्या पुस्तकाचे अनावरण

 


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
स्पंदन प्रकाशनाची नववी निर्मिती असलेल्या ‘तीर्थरुप तात्या’ या पुस्तकाचे अनावरण समाजप्रबोधनकार, महाराष्ट्र भूषण, विनोदाचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज (देशमुख) इंदुरीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक डाॅ.संदीप डाकवे, आनंदा विठ्ठल मराठे, सरपंच आत्माराम पाचुपते, पंकज मराठे, विनोद मराठे, जीवन काटेकर, सनी मराठे, गणेश मराठे, संदीप मराठे, सुरेश मराठे, मोहन मराठे, महेश पवार, अमोल मराठे, शुभम मराठे, रघुनाथ पाचुपते व इतर मान्यवर उपस्थित होते.

डाॅ.संदीप डाकवे यांचे वडील राजाराम डाकवे (तात्या) यांचे काही महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्यामुळे डाॅ.डाकवे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला एक सामाजिक उपक्रम राबवला आहे. यंदाचा वाढदिवस साजरा न केल्यामुळे त्या सामाजिक उपक्रमात खंडू पडू नये यासाठी तात्यांच्या आठवणी असलेले ‘तीर्थरुप तात्या’ पुस्तक प्रकाशित केले असल्याचे डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी इंदूरीकर महाराज यांना त्यांचे रेखाचित्र भेट दिले. इंदूरीकर महाराज यांनी पुस्तक आणि चित्राचे कौतुक केले.

यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांच्या वाढदिवसानिमित्त मनातलं चारोळी संग्रह प्रकाशन, शालेय विद्यार्थ्यांना  वहया वाटप, शालेय तक्त्यांचे वाटप, अनाथाश्रमात धान्यांचे वाटप, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, रक्तदान, डाॅक्युमेंटरी पोस्टर प्रकाशन, स्नेहबंध पुस्तक प्रकाशन, ग्रंथालयाला 75 पुस्तके भेट अशाप्रकारे प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत एका वेगळया उपक्रमाने साजरा केला आहे.

राजाराम डाकवे (तात्या) यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोलाचे होते. अनेक सामाजिक, धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रभागी असत. कुटूंब, शेती, प्राणी यांच्यावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. बैल, शेळी यांसह घरातील पाळीव जनावरे यांच्याशी असलेले त्यांचे नाते अतूट होते. याशिवाय ते कुटूंबवत्सल होते. शेतीमध्ये काम करताना, औजारे बनवताना, मशागत करताना अशा त्यांच्या अनेक आठवणी आज फोटोरुपाने उपलब्ध आहेत.  

या पुस्तकात राजाराम डाकवे (तात्या) यांचे 200 हून जास्त फोटोग्राफ्स आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोपेज खाली थोडक्यात माहिती यात आहेत. फोटोची सुसंगत आणि सुयोग्य मांडणी व माहिती यात असल्याने पुस्तकाने वेगळी उंची गाठली आहे. तीर्थरुप तात्या या अनोख्या वेगळया पुस्तकाने तात्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

राजाराम डाकवे (तात्या) यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन नदीत न करता त्यामध्ये वृक्षारोपण केले, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत त्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.

‘तीर्थरुप तात्या’ या पुस्तकात तात्यांच्या जीवनातील विविध प्रसंगानुरुप सुसंगत फोटो, स्थळ दिनांकासह थोडक्यात व योग्य माहिती असल्याने पुस्तकाने वेगळी उंची गाठली आहे. धार्मिक स्वभावाचे तात्या असल्याने त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प.इंदूरीकर महाराज यांच्या हस्ते झाले हा एक योगायोग आहे. असे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

डाॅ.संदीप डाकवे यांची साहित्यसंपदा :

यापूर्वी डाॅ.डाकवे यांची मनातलं, जलयुक्त शिवार अभियान, समाज स्पंदनाची पत्रे, स्पंदन कवी मनांचं, दीप उजळतो आहे, स्नेहबंध, गाठीभेटी, स्मृतीगंध इ. पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर मुक्काम पोस्ट डाकेवाडी, सेलिब्रिटी कट्टा, ग्रेट स्केच भेट, ऋणानुबंध, अक्षर शुभेच्छा ही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.