काँग्रेसच्या पाटण तालुका अध्यक्षपदी अभिजित पाटील यांची निवड


अभिजित पाटील यांना नियुक्तीपत्र देताना आ. पृथ्वीराज चव्हाण. सोबत काँग्रेसचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाटण तालुकाध्यक्षपदी अभिजित हिंदुराव पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने निवड केली आहे. त्यांची निवड जाहीर होताच जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नुकतीच राष्ट्रीय काँग्रेस राज्य कार्यकारिणीने सातारा जिल्ह्यातील सर्व तालुके व शहर अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यात अभिजित पाटील यांच्यावर पाटण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अभिजित पाटील हे पाटण तालुक्यात काँग्रेस वाढविण्यात आघाडीवर असलेले काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.

त्यांनी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून चांगले कार्य केले आहे. सातारा जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीवर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांची पाटण तालुकाध्यक्ष म्हणून निवड करून प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतेच माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तालुकाध्यक्ष पदावरील नियुक्तीचे पत्र अभिजित पाटील यांना दिले.