सांचीचं बोरन्हाण; मुलांना खाऊबरोबर दिले वही आणि पेन महिलांना वाण म्हणून पुस्तक भेट
तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
शिशुसंस्कार म्हणून मुल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रातीला लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची पारंपारिक पध्दत आहे. बदलत्या ऋतुची बाधा मुलांना होवू नये व या काळात असलेली फळे मुलांनी खावीत हा हेतू यामागे असतो. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कु.सांची रेश्मा संदीप डाकवे या चिमुरडीचा बोरन्हाण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
सांचीला काळ्या रंगाचे कपडे, हलव्याचे दागिने घातले होते. उपस्थित महिलांनी प्रथम सांचीला औक्षण केले. त्यानंतर बोर, कुरमुरे, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, गाजराचे तुकडे, तिळगुळ, यासह लहान मुलांना आवडणारे चाॅकलेट, बिस्कीट, जेम्स गोळया अशा पदार्थांनी सांचीला बोरन्हाण घातले. त्यानंतर डाकवे परिवाराने मुलांना खाऊ वाटप केले. हा क्षण स्पंदन डाकवे, ओवी पोळ, सौरभ नलवडे, प्रेरणा माने, जैद या मुलांनी खूप एन्जाॅय केला. दरम्यान, मुलांना वही, पेन यांचेही वाटप केले. यावेळी रेश्मा डाकवे, पुनम जाधव, भारती पोळ, संध्या कुंभार, शितल बनसोडे, वैशाली नलवडे, संगिता कदम, सौ.माने व अन्य महिला उपस्थित होत्या.
बोरन्हाण समारंभासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. लेक वाचवा-लेक घडवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, आमची लेक आमचा अभिमान, लेक वाचवा लेक शिकवा, देषाला हवेत शिवबा जिजाऊ म्हणून स्त्रियांना मानाने वागवू, तिळगूळ घ्या-गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा असे सामाजिक संदेश लिहले पतंगानी डेकोरेशनासाठी वापरले होते. त्या पतंगावर राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, बेटी बचाओ-बेटी पढाओ चा लोगोंची आकर्षक मांडणी चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केली होती. घरगुती कार्यक्रम करताना सामाजिक संदेश देण्याची परंपरा डाकवे परिवाराने या निमित्ताने कायम जपल्याचे दिसून आले. दरम्यान, महिलांचा हळदीकुंकू समारंभ झाला. यामध्ये महिलांना चरित्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यापूर्वी सांचीच्या बारशावेळी डाकवे परिवाराने सामाजिक संदेश देणाऱ्या पत्रिका, पिशव्यांचे वाटप, वृक्षारोपण, समाजप्रबोधनपर कीर्तन, मंदिर जीर्णोध्दार देणगी इ. विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. याशिवाय घरातील सर्व सदस्यांचे वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरे केले जातात.
___________________________________
महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण :
26 जानेवारी आणि बोरन्हाण कार्यक्रमाचे औचित्य साधत डाॅ.संदीप डाकवे आणि परिवाराने जिल्हा परिषद केंद्रशाळा, काळगांव ला महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांनी डाकवे परिवाराचे आभार मानले आहे.
___________________________________