कामगार चळवळीच्या दैदीप्यमान इतिहासात अनेक दिग्गज नेत्याचं ऐतिहासिक योगदान हे कामगार चळवळीतल्या भावी पिढीतील कामगार कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सतत उत्तेजक आणि स्फुर्तीदायक ठरले आहे. आजच्या आधुनिक कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगारांना आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. तर यांत्रिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण इत्यादी कारणांमुळे गेल्या 25 ते 30 वर्षांपासून कामगार चळवळीपुढे सातत्याने नवनवीन आव्हाने उभी राहीली आहेत. अशा अवस्थेत सध्याच्या भयानक बेकारीच्या काळात नोक-या टिकविणे तसेच त्यांचे हक्क अबाधीत ठेवणे हे सध्याच्या काळातील फार मोठे आवाहन असून, ते पेलण्यासाठी सातत्याने संघर्ष,आंदोलने तसेच बदलत्या सरकारी राजवटींबरोबर कागदोपत्री पाठपुरावा करुन सरकारला जागृत करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असणारे अनेक मातब्बर कामगार नेते निस्वार्थी वृत्तीने सतत जीवापाड मेहनत घेत आहेत. अशा या नेत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तरुण तडफदार,धाडसी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा उल्लेख कधीही टाळता येणार नाही.
माथाडींचे भाग्यविधाते व आराध्यदैवत कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईसारख्या भांडवलदारांच्या नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन ची स्थापना करून वर्षानुवर्षे आर्थिक शोषण आणि पिळवणुकीतून तमाम माथाडी कामगारांना मुक्त केले. आहोरात्र कष्ट करून अण्णासाहेबांनी अन्यायग्रस्त माथाडी कामगारांना संघटीत करून माथाडींच्या न्याय्य- हक्कांसाठी भव्य आंदोलने उभारून ना भुतो न भविष्यती असा संर्घषाचा महामेरू उभा केला व तत्कालीन सरकारला ऐतिहासिक माथाडी कायदा तसेच माथाडी बोर्डांच्या स्थापना करण्यास भाग पाडले. इतकेच नव्हेतर संघटनेच्या माध्यमातून माथाडी पतपेढी,माथाडी ग्राहक सोसायटी व माथाडी हॉस्पीटलची स्थापन केली. विषेश म्हणजे माथाडी कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून घरकुल योजना राबविल्या. अण्णासाहेबांच्या निधनानंतर कै.शिवाजीराव पाटील, कै.संभाजीराव पाटील यांनी संघटनेच्या सरचिटणीस पदाची धुरा संभाळली व अण्णासाहेबांच्या शिकवणुकीनुसार त्यांच्या ऐतिहासिक कार्याची जपणूक केली. तसेच संघटनेचे अस्तित्व अबाधित ठेवून संघटनेला अधिक बळकट केले. वरील दोघांच्या निधनानंतर नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव व संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्य सहकार्याने संघटनेचे सरचिटणीस व प्रमुख म्हणून कामकाज पाहत आहेत.
नरेंद्र पाटील यांनी विविध माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रा.फंड,ग्रॅच्युईटी रक्कमेवरील व्याजाचा टीडीएससारखा महत्वाचा प्रश्न माथाडींचे आशास्थान मा.शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्याने केंद्रीय मंत्रीमंडळाच्या माध्यमातून सोडविला. माथाडी कामगारांच्या वेळोवेळी निर्माण होणा-या संकटांविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने उभारली. मॉल संस्कृतीमुळे व शासनाच्या नवीन धोरणामुळे होणा-या नुकसानीच्या विरोधात अनेकवेळा मोर्चे, मोटरसायकल रॅली इत्यादी आंदोलने उभारली. माथाडी कामगारांच्या धोरणात्मक प्रश्नांबरोबरच दैनंदिन प्रश्नांचीही सोडवणूक करण्याकरीता नरेंद्र पाटील नेहमीच जागृत असतात. सध्या ते संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करीत असून, कष्टकरी कामगारांना माथाडी कायदा व बोर्डाच्या योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे कोरोना या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्व ठिकाणी लॉकडाऊन पुकारला होता. त्या काळात नरेंद्र पाटील यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कामगारांबरोबर बाजार आवारात उभे राहून नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होण्यासाठी अथक मेहनत घेतली तर माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना शासनाचे विमा संरक्षण दयावे, कोरोनामुळे मृत्यु झालेल्या माथाडी कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी शासनाकडे सतत मागणी केली.
माथाडी कामगारांच्या हितासाठी अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या बलाढय संघटनेचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील नेहमीच अग्रभागी असतात,याची जाणिव महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांना आहे. माथाडी कामगारांचे न्याय-हक्क अबाधित ठेवून तसेच वेळोवेळी कामगारांवर येणा-या संकटांचा मुकाबला करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे अण्णासाहेबांच्या संघटनेची ताकद म्हणजे अशिया खंडातील बलाढय आवाज म्हणून आजही ओळखला जातो. माथाडी कामगारांच्या प्रचंड ताकदीमुळे त्यांना कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सत्तेच्या काळात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्या आमदारकीच्या काळात विधानपरिषदेत माथाडी कामगारांवर होणा-या अन्यायावर आणि तत्कालीन समस्यांवर सभागृहात प्रभावी, मुद्देसुद्द भाषणे करून माथाडींच्या अनेक समस्या सोडविण्यास सरकारला त्यांनी भाग पाडले पण नरेंद्र पाटील यांनी कोणत्याही पक्षाशी तडजोड करताना फक्त माथाडी कामगारांचे हित हेच एकमेव उदीष्ट डोळयासमोर ठेवले व त्याच माध्यमातून त्यांनी राजकीय वाटचाल केली. पक्षभेद न करता त्यांनी माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि.25 सप्टेंबर,2016 रोजी वाशी नवीमुंबई येथील माथाडी कामगार मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना आणले होते, राजकीय कारकीर्दीस 50 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना 25 सप्टेंबर,2017 च्या मेळाव्यात आणून त्यांचा तमाम माथाडी कामगारांतर्फे भव्य सत्कार केला. दि.25 सप्टेबर,2019 रोजी वाशी नवीमुंबई येथील मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीससाहेब आणि शिवसेना प्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांना प्रमुख पाहुणे म्हणून आणले व इतर मंत्री महोदय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत माथाडी कामगार कायदा 1969 व अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी मर्यादितचा सुवर्णमोहत्सव दिमाखात साजरा केला.
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्थापनेपासून माथाडी कामगारांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला भक्कम पाठबळ दिले, यास्तव नरेंद्र पाटील यांना शरचंद्रजी पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी देवून माथाडी चळवळीचा सन्मान केला. विधान परिषदेचे आमदार म्हणून त्याकाळात त्यांनी त्यांचे मुळ गाव असलेल्या पाटण तालुक्यातील गावांना तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तसेच तालुक्यातील गांवाना विकास निधी देवून स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जतन करण्याचे कार्यही केले आहे. अशा त्यांच्या अनोख्या कार्यपध्दतीमुळे सेना-भाजप च्या सत्तेच्या काळात आणि आत्ताच्या भाजच्या आणि शिंदे गट शिवसेनेच्या सरकारमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली,या पदाला मंत्री दर्जा दिला. या महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरूणांना महामंडळाच्या योजनांचा फायदा मिळवून दिला. महामंडळाच्या माध्यमातून कोणताही भेदभाव न बाळगता महाराष्ट्राच्या काना-कोप-यात दौरे करून नव-नवे उद्योजक घडविण्याचे कामही नरेंद्र पाटील यांनी केले आणि आजही महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नवनवीन उद्योजक निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत.
कामगार आणि राजकीय क्षेत्रातील वाटचालीबरोबरच त्यांनी अण्णासाहेबांच्या सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी डॉ.प्राची नरेंद्र पाटील यांनी स्थापन केलेल्या ‘प्राना फाऊंडेशन (रजि.) या संस्थेच्या कार्याला नेहमीच सहकार्य केले. या संस्थेमार्फत रक्तदान, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावे, महिलांचे हळदी-कुंकु, मागदर्शक शिबीरे, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सर्व उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी ते आपल्या पत्नीला मोलाची साथ देत असतात तर अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशन या संस्थेची स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आर्थिक, राजकीय,सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतून जनसामान्यांसाठी अहोरात्र झटणा-या नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या यापुढील कार्यास शक्ती,युक्ती आणि भक्ती यांचे पाठबळ लाभून त्यांचे व्यक्तीमत्व प्रतिभाशाली आणि उत्तुंग व्हावे तसेच चंद्रसुर्यासारखे प्रकाशमान राहो व त्यांना दिर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या कार्याला पदोपदी यश मिळावे याच त्यांना वाढदिवसांनिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!