आरोग्याची संपत्ती जपली पाहीजे : ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

लोकांनी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहीजे. आरोग्य ही संपत्ती आहे ती जपली पाहिजे यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे असे मत समाजप्रबोधनकार, महाराष्ट्र भूषण, विनोदाचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज (देशमुख) इंदुरीकर यांनी व्यक्त केले. ते पाटण तालुक्यातील निर्मलग्राम पाचुपतेवाडी (गुढे) येथील कै.विठ्ठल ज्ञानू मराठे व कै.गंगुबाई विठ्ठल मराठे यांचे पुण्यस्मरणार्थ आनंदा विठ्ठल मराठे यांनी आयोजित केलेल्या कीर्तन सोहळयात बोलत होते.

आज 50 टक्केपेक्षा जास्त लोक कॅन्सर या आजाराने त्रस्त आहेत. केमीकलयुक्त आहार खाल्यामुळे हा आजार होत आहे. त्यासाठी योग्य, सकस आहार घेणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. त्यामुळे लोकांनी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे.

ह.भ.प.निवृत्ती महाराज यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे सांगत लोकांना खळखळून हसवलेच आणि काही भावनिक प्रसंग कथन करुन लोकांच्या डोळयात पाणीदेखील आणले. सहज सोप्या शब्दात लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचे निरुपण केले.

तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे, विध्यार्थ्यांनी अभ्यास करुन आपले जीवनमान उंचवावे. आपल्या जीवनात आई, वडील, संत आणि भगवंत हेच श्रेष्ठ आहेत. त्यांना महत्त्व द्या, आदर करा तुम्हाला जीवनात काही कमी पडणार नाही. पैसा हे अंतिम सत्य नसून माणूसकी जपा असे मत ह.भ.प.निवृत्ती महाराज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. समाजाच्या एकंदरित परिस्थितीवर त्यांनी विनोदी परंतू मार्मिक पध्दतीने मार्गदर्षन केले. त्यांना कीर्तनसाथ ह.भ.प.विजय महाराज रामीष्टे यांनी व त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनी केली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदा विठ्ठल मराठे यांना विनोद मराठे, सनी मराठे, गणेश मराठे, संदीप मराठे, पंकज मराठे, सुरेश मराठे, मोहन मराठे, महेश पवार, अमोल मराठे, शुभम मराठे, रघुनाथ पाचुपते आणि समस्त ग्रामस्थ मंडळ पाचुपतेवाडी यांनी विशेष सहकार्य केले.

थंडीतदेखील कीर्तनाला प्रचंड गर्दी :

गेले दोन ते तीन दिवसापासून कडक थंडी पडली आहे. कीर्तनाची वेळ सायंकाळी होती. ऐन थंडीतही विभागातील अनेक भाविक भक्तांनी, अबाल वृध्दांनी इंदूरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकण्यास प्रचंड गर्दी केली होती. आनंदा विठ्ठल मराठे आणि परिवाराने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.