कराड शहर काँग्रेसच्या अध्यक्ष पदी ऋतुराज मोरे


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कराड नगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शहराध्यक्षपदासाठी प्रथमच एका युवा चेहऱ्याला संधी दिली असून या पदासाठी ऋतुराज मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात ऋतुराज मोरे यांना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष झाकीर पठाण, अशोकराव पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रदीप जाधव, अमित जाधव आदींच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

नुकतेच काँग्रेस पक्षाकडून डिजिटल सभासद नोंदणी अभियान राबविले गेले होते. यानुसार जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात जास्तीत जास्त सभासद नोंदणी केली गेली त्यानुसार व पक्षाच्या नियमानुसार जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांची नवनियुक्ती प्रदेश पातळीवरून जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वीचे शहराध्यक्ष नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. 

सातारा जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा आजपर्यंत राहिला आहे. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर कायमच राहिलेला आहे. अशा या जिल्ह्याचे नेतृत्व आमचे नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) करीत आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यरत आहेत. कराड शहर अध्यक्ष पदी माझी निवड केल्याबद्दल आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, तसेच युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज दादा यांचे मनःपूर्वक आभार यानिमित्ताने मी मानतो. तसेच आधीचे अध्यक्ष नगरसेवक आप्पा माने यांच्या कार्यकालात अनेक महत्वपूर्ण उपक्रम शहरात राबविले गेले. त्यामध्ये सभासद नोंदणी अभियान असेल किंवा भाजप सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेली विविध आंदोलने असतील तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात काढण्यात आलेली तिरंगा रॅली असो हे सर्व उपक्रम आप्पानी अतिशय चांगल्या प्रकारे राबविले. शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते एकसंध ठेवण्याचे महत्वाचे काम आप्पानी त्यांच्या कार्यकाळात अत्यंत चांगल्या रित्या सांभाळले. अशी प्रतिक्रिया नवनियुक्त शहर अध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी दिली. 

नवीन शहराध्यक्ष निवड झालेले ऋतुराज मोरे यांचे वडील बापूसाहेब मोरे हे कराड नगरपालिकेचे नगरसेवक होते. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे हे त्यांचे मोठे बंधू आहेत. मोरे यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा जरी असला तरी शहरात त्यांच्या कुटुंबाची ओळख वारकरी कुटुंब अशी आहे. हे कुटुंब कायमच काँग्रेसच्या विचारांचे पाईक राहिले असून मुख्यतः आ. पृथ्वीराज बाबांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.