सहकार क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली : शेखर चरेगावकर

 


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले अर्थशास्त्र विभाग व नवभारत पतसंस्था, तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार परिषद संपन्न झाली. या परिषदेत 'सहकार काल,आज आणि उद्या' या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची प्रमुख उपस्थित होती.

 कार्यक्रमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरूण गाडे हे होते. याप्रसंगी अमोल माने, (व्यवस्थापक नवभारत पतसंस्था, तळमावले) , प्रा सुधीर सावंत, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापुजन व संस्था प्रार्थनेने झाली

 यावेळी बोलताना शेखर चरेगावकर म्हणाले की, सहकार हे क्षेत्र पूर्वापार चालत आलेली चळवळ आहे. सहकार क्षेत्रात एकूण ५२ प्रकारच्या सहकारी संस्था सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये बँक, पतसंस्था, दूध डेअरी, सोसायटी, साखर कारखाना, सहकारी सुत गिरणी, पाणीपुरवठा संस्था, इ. प्रकारच्या माध्यमातून लोकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असते. लोकांनी एकत्रित येऊन लोकांच्या गरजा भागविण्यासाठी निर्माण केलेली संस्था म्हणजे सहकार होय. असा साधा सुधा अर्थ प्राप्त होतो. या सहकार क्षेत्रातुन वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, व राष्ट्र उभारणीमध्ये सहकार क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. बदलत्या धोरणानुसार बँकांनी, पतसंस्थांनी आपल्या कार्यप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी लोकांचा विश्वास संपादन करून ठेवीदार, कर्जदार, संचालक, संस्थापक यांच्यात समन्वयक साधणे गरजेचे आहे. देशाच्या जडणघडणीत सहकार क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. बँकांना धोरणात्मक, रचनात्मक अभ्यास करून आपली प्रगती साधता आली पाहिजे. तसेच अलीकडच्या काळात सहकार क्षेत्रात संशोधन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेखर चरेगावकर  यांनी केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरूण गाडे म्हणाले की 'विना सहकार नाही उध्दार' या ब्रिदाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात नवभारत पतसंस्था, तळमावले यांच्या वतीने शेखर चरेगावकर यांचे घड्याळ व शाल देऊन ज्येष्ठ संचालक राजाराम शिबे व व्यवस्थापक अमोल माने यांनी सत्त्कार केला. यावेळी शेखर चरेगावकर याांनी सुरूवातीला घोषित केले की, ' सहकार काल, आज आणि उद्या' या विषयावर १५ मुद्दे सांगणार आहे, जो कोणी विद्यार्थी अथवा विद्यार्थींनी शेवटी हे सर्व मुद्दे सांगेल त्या विद्यार्थांला त्यांनी लिहिलेले 'रोजगाराच्या संधी ' नावाच पुस्तक प्राचार्यांच्या शुभहस्ते देण्यात येणार. या पुस्तकाचे मानकरी कु.श्रद्धा जाधव हि विधार्थिनी ठरली. तिला प्राचार्यांच्या शुभहस्ते पुस्तक देण्यात आले. या कार्यक्रमास वांग खोऱ्यातील विविध पतसंस्था, बँका आणि विविध कार्यकारी सोसायटी या संस्थांचे पदाधिकारी, क्लार्क, संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी शेखर चरेगावकर यांचा कॉलेजच्या वतीने शाल, श्रीफळ, कॉलेजचा 'झेप ' अंक देऊन सत्कार करण्यात आला. सहकार परिषदेचे नेटके नियोजन करण्यासाठी प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांचे मार्गदर्शनाखाली गुरुदेव कार्यकर्ते व  श्री संजय देसाई मार्गदर्शन सुचनेनुसार (संस्थापक अध्यक्ष नवभारत पतसंस्था,तळमावले) नवभारत पतसंस्थेच्या कर्मचारी वर्गाने प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुधीर सावंत सरांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी सरांनी केले. आभार प्रा. नवनाथ पुजारी यांनी मानले .