स्त्रीने स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे: सौ.सगिता येळवे

 सौ.संगिता येळवे मार्गदर्शन करताना.
तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
स्त्रीने स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे, आपल्यामध्ये असणारे गुण ओळखून प्रगती साधली पाहिजे असे मत सुप्रसिध्द कवियित्री सौ.संगिता येळवे यांनी व्यक्त केले. त्या डाकेवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळयानिमित्त आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ग्रा.पं.सदस्या सौ.माया साळुंखे, अंगणवाडी मदतनीस मीना डाकवे, अनुसया डाकवे, ह.भ.प.नामदेव डाकवे, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल डाकवे, वसंत डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सौ.येळवे पुढे बोलताना म्हणाल्या, ‘‘हळदी कुंकू समारंभामधून विचारांची देवाण घेवाण होते, डाकेवाडीच्या मंडळाने हा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये आपुलकी, प्रेम जिव्हाळा आहे. येणाऱ्या भावी पिढीने तो जपून ठेवायला हवा.’’



अनिल डाकवे म्हणाले, श्री दत्त मंदिर जीर्णोध्दारासाठी गावातील लोकांनी केलेले श्रमदान कौतुकास्पद आहे. लोकांनी मंदिरासाठी दिलेला वेळ अभिमानास्पद आहे. गावातील सामाजिक आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  

ह.भ.प.नामदेव डाकवे म्हणाले, डाकेवाडी गावाला अध्यात्माचा वारसा आहे. आज आपल्या पारायण सोहळयाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये गावातील लोकांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. दरम्यान, व्यासपीठचालक ह.भ.प.नामदेव डाकवे तसेच पाटण तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी अनिल डाकवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सौ.संगिता येळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



ह.भ.प.वसंत डाकवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि हार देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार आणि सुत्रसंचालन डाॅ.संदीप डाकवे यांनी केले. कार्यक्रमास डाकेवाडीतील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्रिमुर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ डाकेवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी (काळगांव) यांनी विशेष परिश्रम घेतले.