तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ढेबेवाडी विभागातील मालदन गावच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या गटाच्या पॅनेलने राष्ट्रवादी प्रणित पॅनेलचा धुव्वा उडवत सरपंचपदासह आठ जागांवर विजय मिळवून सत्तांतर घडविले. गीतांजली काळे या लोकनियुक्त सरपंच झाल्या. ना. शंभूराज देसाई प्रणित पॅनेलचे प्रमुख जोतिराज काळे यांच्यासह युवा नेते नितीन काळे यांनी तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेवून जिवाचे रान करत मोठा विजय संपादन केला आणि विजयात सिंहाचा वाटा उचलला.
मालदन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आजपर्यंत त्यांची गावावर एकहाती सत्ता होती. गावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कै. मधुकर काळे गुरुजी यांची हुकमत चालत आली होती. त्यांच्या नंतर राष्ट्रवादीची पक्कड ढिली झाली असल्याचे दिसून येत आहे. जोतिराज काळे यांनी देसाई गट वाढवताना नुकत्याच झालेल्या दोन्ही सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध करत आपला वरचष्मा ठेवला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना युवा नेते नितीन काळे व प्रा. यशवंत काळे यांची मोलाची साथ मिळाली. नितीन काळे यांनी तरुण कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी करत नामदार शंभूराज देसाई यांनी गावामध्ये केलेली अनेक विकास कामे मतदारांच्या घराघरात पोहोचवली.आणि विजयश्री खेचून आणली. याअगोदरही नितीन काळे यांनी देसाई गटासाठी आपले योगदान देताना ग्रामपंचायत लढवली होती. विजयी भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे सरपंचपदी सौ. गीतांजली काळे, सदस्यपदी जोतिराज काळे, वैभव काळे, सागर गायकवाड, सुजाता काळे, कल्पना देसाई, मीना जाधव, ज्योती चव्हाण हे उमेदवार बहुमताने विजयी झाले तर विरोधी बहिरदेव ग्रामविकास पॅनेलचे मारुती पाटील व सुनंदा जाधव विजयी झाल्या.
विजयानंतर ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यकत्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत गावात जंगी मिरवणूक काढली. पॅनेलचे विजयी उमेदवार व युवक कार्यकर्त्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अभिनंदन केले
श्री भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे जोतिराज काळे, नितीन काळे, यशवंत काळे, संभाजी काळे, सतीश काळे, दत्ता कारंडे, निलेश काळे, चंद्रकांत चव्हाण, अशोक काळे सर, राजेंद्र कदम, राजेश साळुंखे,संजय काळे, सुभाष काळे, प्रशांत घारगे, सचिन नलवडे, शिवाजी काळे, संभाजी पन्हाळे, मधुकर गायकवाड, मारुती देसाई, प्रा.अधिकराव कणसे, संतोष जाधव, विलास साळुंखे व अरुण चव्हाण यांनी व अनेक युवकांनी परिवर्तनाचा ध्यास घेवून मतदारांच्या घरोघरी जाऊन गावच्या विकासाचे महत्व पटवून दिले.
______________________________
मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे गावात अनेक विकासकामे झाली आहेत. यामुळेच आम्हाला विजय खेचता आला. आम्ही गावची उर्वरित सर्व विकासकामे मार्गी लावून मालदन गाव विकासाच्या बाबतीत आदर्श करू. आमचे पॅनल प्रमुख जोतिराव काळे व गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. गीतांजली काळे, प्रा. यशवंत काळे, प्रतिष्ठित युवा कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली गावाचा सर्वांगिण विकास करून मतदारांनी टाकलेला आमच्यावरील विश्वास सार्थ ठरवू.
- युवा नेते नितीन काळे
_____________________________