त्यांनी दिले डाॅक्टरांना कलेतून आत्मिक समाधान


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
वयाच्या 18 व्या वर्षी सातारा जिल्हयातील पहिले ऑपेरेशन त्यांचे झाले आणि त्यांना खऱ्या अर्थाने जीवनदान मिळाले. या ऑपेरेशननंतर त्यांनी कलेचे उच्च शिक्षण घेतले. कलेचे ज्ञानदान करत, अनेक मुलांना घडवत ते सेवानिवृत्त झाले. डाॅक्टर आणि दवाखान्याच्या ऋणातून ते उतराई होवूच शकत नव्हते. कारण त्यांचा जीव वाचवला होता. त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपण काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या कलेतून डाॅक्टरांना आत्मिक समाधान देण्याचा विचार केला.

पाटण तालुक्यातील कुठरे येथील दामोदर शामराव दिक्षीत यांचे डाॅ.एच.आर.टाटा यांनी कृष्णा हाॅस्प्टिलमध्ये 1982 साली हदयावरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. मिटरल व्हाॅल्वचे होल बारीक झाल होते. त्यामुळे त्यांच्या फुप्फसावर दडपण येत होते. श्वास घेताना त्रास होत होता. धाप लागत होती. उठता बसता त्रास होता. मेजर हार्ट ऑपेरेशन करुन त्याच्या मिटरल व्हाॅल्वचे होल पाव सेंटीमिटर झाले होते. ते तीन ते सोडतीन सेंटीमिटर पुन्हा करण्यात आले. अशा तर्हेचे ऑपेरेशन त्याकाळी फक्त मिरज, पुणे, मुंबई येथेचे होत होते.

कलाशिक्षक दामोदर दिक्षीत यांनी कृष्णा हाॅस्पिटलचे डाॅ.सुरेश भोसले, डाॅ.अतुल भोसले यांना जाळीदार पिंपळ पानावर त्यांच्या छबी साकारुन भेट दिल्या. या कलात्मक भेटीने डाॅ.भोसले भावूक झाले. यावेळी त्यांच्या समवेत रोटरी क्लब कराड चे सचिव चंद्रशेखर पाटील, मलकापूरचे उपसरपंच उमेश कुलकर्णी, चेतन दिक्षीत उपस्थित होते.

खरेंतर कृष्णा हाॅस्पिटलमधून आतापर्यंत हजारो रुग्ण बरे होवून गेले आहेत. परंतू श्री.दिक्षीत सर यांच्या सारखा संवेदनशील कलावंत विरळाच. सरांच्या या अनोख्या भेटीची चर्चा हाॅस्पिटलमध्ये रंगली. विशेष म्हणजे ऑपेरेशन झाल्यानंतर सरांचे आयुष्य साधारण मनुष्यासारखे झाले आहे. याचे संपूर्ण श्रेय ते हाॅस्पिटल आणि डाॅक्टरांना नेहमीच देतात.

कोरोनाच्या काळात दिक्षीत सरांनी पिंपळपानावर चित्रे रेखाटण्याचा छंद जपला त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये झाली होती. याशिवाय शैक्षणिक काम करताना अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले होते. बोलक्या भिंती, टाचण वही हे उपक्रम त्यांचे विशेष गाजले. पिंपळपानावरील कलाकृती भेट देवून दवाखान्याच्या ऋणातून काही अंशी उतराई होण्याचा प्रयत्न दिक्षीत सर यांनी केला आहे.