सणबूरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम... सरपंच पदी विशाल जाधव यांचा दणदणीत विजय.


विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना सत्यजितसिंह पाटणकर व इतर मान्यवर 

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा
संपूर्ण तालुक्यात राष्ट्रवादीची पडझड सुरू असताना तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या ढेबेवाडी विभागातील सर्वात मोठी आणि प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पदरात विजय टाकणाऱ्या सणबूर ग्रामपंचायतीत नेमके काय होणार ? याची उत्सुकता संपूर्ण तालुक्यास होती. मात्र, नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाने विजयाचा झेंडा पुन्हा एकदा फडकवून सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले आहे.

ढेबेवाडी विभागात १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक बुरूज ढासळून राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक धक्के बसले. पण, सणबूरमध्ये मात्र विरोधी गटाची काही डाळ शिजलीच नाही आणि सणबूरमध्ये राष्ट्रवादीने दिमाखदार विजय मिळवून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राखला.

सणबूर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पाटणकर गट आणि परंपरागत पालकमंत्री शंभूराज देसाई गटातच मुख्य लढत झाली. पाटणकर गटाचे सणबूर ग्रामविकास पॅनेल व विरोधी ना. देसाई गटाचे विठ्ठलाईदेवी परिर्वतन पॅनेल अशी सरळ लढत झाल्याने निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. सणबूर ग्रामविकास पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला असून विरोधी गटाला एका जागेवर विजय मिळाला आहे. पाटणच्या माजी सभापती उज्वला जाधव यांचे पती विशाल चंद्रकांत जाधव यांना थेट सरपंच पदाची उमेदवारी दिली होती. विशाल जाधव मोठे मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत. तर सदस्य म्हणून किरण संपत जाधव, जयश्री दगडू जाधव, विजया शंकर सुतार, संदीप जगन्नाथ जाधव, संगीता तानाजी जाधव, शारदा राहुल जाधव, शामराव ज्ञानू जाधव, सुरेखा सुरेश जाधव, प्रकाश खाशाबा कुंभार यांनी विजय मिळवला आहे. तर विरोधी विठ्ठलाईदेवी परिवर्तन पॅनेलचे संतोष पाटील विजयी झाले आहेत. सणबूर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या निष्ठावंत, कार्यकर्त्यांनी सणबूर ग्रामविकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी माजी सभापती उज्वला जाधव, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पोपट खेडेकर, माजी सरपंच सचिन जाधव, माजी उपसरपंच संदिप जाधव व स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत संघटन हेच विजयाचे प्रमुख कारण ठरले आहे.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, माजी सभापती उज्वला जाधव, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, माजी उपसभापती प्रतापराव देसाई यांनी अभिनंदन केले.