तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
डाॅ.संदीप डाकवे यांचे वडील स्व.राजाराम डाकवे यांचे 12 सप्टेंबर 2022 मध्ये आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने डाकवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. स्व.तात्यांच्या आठवणी जागवणारे ‘तीर्थरुप तात्या’ पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे.
राजाराम डाकवे (तात्या) यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोलाचे होते. अनेक कार्यात ते नेहमी अग्रभागी असत. कुटूंब, शेती, प्राणी यांच्यावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. बैल, शेळी यांसह घरातील पाळीव जनावरे यांच्याशी असलेले त्यांचे नाते अतूट होते. याशिवाय ते कुटूंबवत्सल होते. शेतीमध्ये काम करताना, औजारे बनवताना, मशागत करताना, विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमात उपस्थिती अशा त्यांच्या अनेक आठवणी आज फोटोरुपाने उपलब्ध आहेत. त्या आठवणी पुस्तकाच्या रुपाने प्रसिध्द व्हाव्यात अशी संकल्पना मनामध्ये आली. यातून हे अनोखे फोटोग्राफी बुक साकारत असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.
यापूर्वी डाॅ.डाकवे यांची दीप उजळतो आहे, स्नेहबंध, गाठीभेटी, स्मृतीगंध इ. फोटोबुक स्पदंन प्रकाशनाने प्रसिध्द केली आहेत.
राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन नदीत न करता त्यामध्ये वृक्षारोपण केले, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.
‘तीर्थरुप तात्या’ या पुस्तकात सुसंगत फोटो, स्थळ दिनांकासह थोडक्यात व योग्य माहिती असल्याने पुस्तकाने वेगळी उंची गाठली आहे. याशिवाय डॉ. डाकवे यांनी आपल्या वडिलांची रेखाटलेली काही रेखाचित्रे देखील यात समाविष्ट केली आहेत. हे वेगळे फोटो बुक सर्वांच्या पसंतीस पडेल असा विश्वास डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांच्या परिवाराने व्यक्त केला आहे.